मेन स्टोरी : तिसरा शोकान्त सामना (भाग २)

जयसिंग पाटील (लेखक ज्येष्ठ पत्रकार, माध्यम अभ्यासक, नाट्यलेखक व कादंबरीकार आहेत.)

महाराष्ट्रातला सहकार रुजला वाढला, त्याला पहिल्या पिढीतले अनुभव, परिश्रम कारणीभूत होते. हे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातून तयार झाले होते. अपवाद वगळता कॉंग्रेसचा विचार प्रमाण मानत होते. पंडित नेहरूंचा, समाजवादी विचारांचा प्रभाव त्यातल्या बहुतेक नेत्यांवर होता. पश्‍चिम महाराष्ट्रातले हे नेते बहुजन मराठा समाजातले होते. ते कसे बदलत गेले. सत्तेच्या सावलीत सरंजामीवृत्तीचे बनत गेले. त्यांची मुले तर राजे आणि युवराज बनले. त्याचे सविस्तर, खोलवरचे चित्रण रंगनाथ पठारे यांच्या ताम्रपट कादंबरीत दिसून येते. राजकारण्यांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीचे सैरभैर होणे, त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे आणि त्यात ते किती आणि कसे टिकून उभे राहतात हे पाहणे म्हणजे तिसरा सामना आहे.

महाराष्ट्रातही त्यांनी नंतरच्या काळात हा प्रयोग केला. तो करतांना त्यांनी इंदिरानिष्ठांची फौज उभी केली. त्याचे फटके वसंतदादांच्या नेतृत्वाला बसले. इंदिराजींची परंपराच पुढे राहुल गांधी, सोनिया गांधी यानी चालवली. दादांना पहिला झटका दिला तो शरद पवारांनी. कॉंग्रेसमधून बाहेर पडून जनतापक्षाच्या सहकार्याने पुलोदच्या आघाडीचा प्रयोग पवारांनी केला. पण दादांच्यापाठित खंजीर खुपसल्याच्या आरोपातून त्यांची आजही सुटका झालेली नाही. वसंतदादा संसदेत गेले. राजस्थानचे राज्यपाल झाले, पण त्यांची गणना गांधीनिष्ठांमध्ये कधीच केली गेली नाही. शरद पवारांचीही तशीच अवस्था. याउलट शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, चाकुरकर यांसारखे व्यापक जनाधार नसलेले नेते राज्यात आणि केंद्रात सत्तेची पदे जास्त काळ उपभोगत राहिले.

वसंतदादा मुख्यमंत्री झाले, पण त्यांचे खरे बळ पश्‍चिम महाराष्ट्र हेच होते. दादांनी दगड उभा केला तरी तो निवडून यावा अशी स्थिती सांगली मतदारसंघाची होती. दादांच्या सावलीत अनेक वर्षे शालिनीताई पाटील यांनी राजकारण केले. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्या महसूलमंत्रीही झाल्या. अंतुलेना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्यात त्यांचा वाटा होता अशी तेव्हा चर्चा होती. वसंतदादांच्या उत्तरार्धात त्यांची सत्तेवरील पकड ढिली होत गेली. अंतर्गत राजकारणातून विष्णुअण्णा पाटील यांना जनता पक्षाच्या संभाजी पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दादांचा वारसा त्यांचे पुत्र प्रकाशबापु पाटील यांच्याकडे आला. प्रकाशबापू अनेक वर्षे खासदार म्हणून निवडून येत राहिले.

सांगली जिल्ह्यात वसंतदादाच्या विरोधात राजारामबापू पाटील यानी राजकारण केले. राजारामबापू यांचा वारसा परंपरेने जयंत पाटील यांच्याकडे आला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत पाटील अर्थ, गृह खात्याचे मंत्री झाले. दादा घराण्याच्या विरोधात राजकारणाचा वारसा त्यांनी पुढे नेला. आर. आर. पाटील, पतंगराव कदम हे नंतरच्या काळात पुढे आलेले सांगली जिल्ह्यातले नेते. पण वसंतदादा यांची पुण्याई इतकी मोठी होती की त्याच्या बळावर प्रकाशबापू फारकाही कर्तृत्व न गाजविता निवडून येत राहिले. त्यांच्यानंतर दादांचे नातू प्रतीक पाटील विजयी होत राहिले.

मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रात राज्यमंत्रीही झाले. मोदी लाटेत प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यानी पराभव केला. संजयकाकांना त्यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादीतल्या अंसुष्टांकडून रसद पुरवठा झाला होता अशी चर्चा त्याकाळात होती. आता परिस्थिती अशी आहे की प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीचा विचार कॉंग्रेस करत नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधूनही त्यांना उमेदवारी मिळवण्यात यश आले नाही.

प्रतीक पाटील यानी पक्षाच्या सर्वपदांचा राजीनामा देऊन राजकारण सन्यासाची घोषणा केली. त्यांच्या या अवस्थेला ते स्वतः आणि कॉंग्रेसमधले राजकारण किती कारणीभूत आहे हा वेगळा विषय ठरू शकतो. कधीकाळी वसंतदादानाही अंतर्गत राजकारणातून अशीच घोषणा करावी लागली होती. मात्र नंतर केंद्रीय नेतृत्वाशी जुळवून घेत ते पुन्हा सक्रिय झाले होते. कदाचित प्रतीक पाटील त्याच मार्गाने जाऊ शकतील. एक खरे की दादांच्या इतका जनसंपर्क, कामाचा झपाटा, निर्णयक्षमता, संस्थात्मकबांधणी त्यांच्या पुत्राकडून किंवा नातवाकडून झाली नाही. दादांनी उभारलेल्या साखर कारखान्यासह सगळ्या संस्था मोडकळीस आल्या आहेत. वसंतदादांच्या पुण्याईवर लोक मते देत नाहीत हे पण आता स्पष्ट झाले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.