दुष्काळाच्या चटक्‍यात अवकाळीचा फेरा

लहरी हवामानामुळे शेतकरी मेटाकुटीला : आंब्यासह उन्हाळी पिकांना फटका बसण्याची भीती

रोहन मुजूमदार

पुणे-जिल्हा सध्या दुष्काळाने होरपळा असून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्याने तापला आहे. त्यातच काही तालुक्‍यांमध्ये शनिवारी (दि. 13) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळी हंगामातील पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कधी दुष्काळ, कधी सुकाळ तर कधी आसमानी संकट अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. आज शेती आणि शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे. “आई जेऊ घालेना अन्‌ बाप भिक मागु देईना’ अशी अवस्थाच शेतकऱ्यांची झाली असून नेमके काय करावे अशा द्विधा मनस्थितीत अडकल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे, ढगाळ हावामानामुळे उन्हाळी हंगामातील पिकांसह आंबा तसेच उशीरा लागवड केलेल्या द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिके काढल्यानंतर बरसल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले नसले तरी कांदा उत्पादकांना काही प्रमाण नुकासान होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, अवकाळी पावसाची व्याप्ती दिवसागणिक वाढू लागली आहे. गेल्या वर्षीही अवकाळी पावसाचा फारसा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्यांचे कंबरडे मोडले होते. हवामानाच्या सततच्या बदलाने शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे.

कोणतेही आस्मनी संकट आल्यावर शेतकऱ्याला हात देण्यासाठी सरकार सरसावले असे आपण नेहमी ऐकतो व वृत्तपत्रांद्वारे वाचतो ही; परंतु आतापर्यंत झालेल्या आस्मानी संकटांचे पंचनामे नोर्दोष पद्धतीने झाले नसल्याने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळू शकलेला नाही. जर असे कोणतेही संकट आल्यास त्याचे पंचनामे निर्दोष पद्धतीने व बांधावर जाऊन होणे गरजेचे आहे, तरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल. यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नुकसान होऊनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना आंदोलनासारखे पर्याय अवलंबावे लागले आहेत. सरकारी यंत्रणा जोपर्यंत सरळ मार्गाने काम करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कायम राहणार आहे.

  • … मात्र उपाययोजना काय करणार?
    गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अवकाळी व गारपिटीने थैमान घातले आहे. या चार ते पाच वर्षांतील आकडेवारीवर जर नजर टाकली तर या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट झाली आहे. या तीन महिन्यांच्या दरम्यानच उन्हाळी हंगामातील पिकांसह कांदा, द्राक्ष पीक अंतिम टप्प्यात असतात. दरवर्षी येणाऱ्या अवकाळी पावसापासून आता पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे उपाययोजना करणार तरी काय? असा सवाल ही शेतकऱ्यांनी उपस्तित केला आहे.
  • जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष
    सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. यात आमचा उमेदवार किती चांगला व विरोधी उमेदवार किती वाईट याचे पाढेच सर्व पक्षीयांकडून वाचले जात आहे. मात्र, यात शेतकऱ्यांच्या बाजुने कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यातच दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. तर जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने चारा छावण्याची मागणी होत आहे. मात्र, आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही पक्ष यावर बोलण्यास तयार नसल्याने “आम्हाला कोणी वाली आहे का’? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.