प्रभाकर अस्पत अकॅडमीला विजेतेपद

मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा

पुणे – प्रभाकर अस्पत अकॅडमी संघाने रोव्हर्स अकॅडमीवर “शूट आउट’मध्ये मात करून पहिल्या मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

पिंपरीच्या नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत अखेरच्या क्षणी गुफरान शेखने (60 मिनिट) गोल करून रोव्हर्स अकॅडमीला प्रभाकर अस्पत अकॅडमीविरुद्ध 3-3 अशी बरोबरी साधून दिली. परंतु, शूट आउटमध्ये प्रभाकर अस्पत अकॅडमीने 7-6 असा विजय मिळवला.

अंतिम लढतीत महंमद सादिकने दुसऱ्या मिनिटाला गोल करून प्रभाकर अकॅडमीला 1-0ने आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून राहुल रसाळने गोल करून रोव्हर्स अकॅडमीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. हाफ टाइमपर्यंत ही बरोबरी कायम होती. यानंतर प्रभाकर अकॅडमीने चेंडूवर ताबा राखून आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे रोव्हर्स अकॅडमीचा खेळाडूंचा वेळ बचावातच केला.

यानंतर दिलीप पाल (32 मिनिट) आणि महंमद सादिक (44 मिनिट) यांनी गोल करून प्रभाकर अस्पत अकॅडमीला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सत्रात प्रणव माने (55 मिनिट) आणि गुफरान शेख (60 मि.) यांनी गोल करून रोव्हर्स अकॅडमीला बरोबरी साधून दिली.

“शूट आउट’मध्ये प्रभाकर अकॅडमीकडून दिलीप पाल, पृथ्वी साळुंके, महंमद सादिक, अरविंद यादव यांनी गोल केले, तर प्रतुष तिवारीला गोल नोंदविता आला नाही. रोव्हर्स अकॅडमीकडून करण बुर्गे, तुषार दुर्गा, गुफरान यांनी गोल केले, तर प्रणव माने आणि अल्ताफ शेखला गोल करता आले नाहीत.

विजेत्यांना जॉन मथाई, व्ही. सी. पंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी केरला ज्वेलर्सचे जोसेफ सेबॅस्टिअन, ब्लू रिद्‌ज स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता क्षीरसागर, आयोजक बिजू आणि शिरलेय जॉर्ज उपस्थित होते.

सविस्तर निकाल : –

प्रभाकर अस्पत अकॅडमी – 3, (4) (महंमद सादिक 2, 44 मि., दिलीप पाल 32 मि.; दिलीप पाल, पृथ्वी साळुंके, महंमद सादिक, अरविंद यादव) वि. वि. रोव्हर्स अकॅडमी – 3, (3) (राहुल रसाळ 3 मि., प्रणव माने 55 मि., गुफरान शेख 60 मि.; करण बुर्गे, तुषार दुर्गा, गुफरान).

इतर पुरस्कार :

बेस्ट गोलकीपर – सुजिन जरुपुला (प्रभाकर अस्पत अकॅडमी), बेस्ट डिफेंडर – गणेश गिरगोसावी (प्रभाकर अस्पत अकॅडमी), बेस्ट हाफ – हर्ष परमार (एक्‍सलन्सी अकॅडमी), बेस्ट फॉरवर्ड – ब्रिअन अरोकिस्वामी (प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर, खडकी), बेस्ट अपकमिंग प्लेअर – आदित्य रसाळ (रोव्हर्स अकॅडमी).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)