‘त्या’ तिघींची अज्ञात समिधा जगवणारी फार्मसिस्ट

स्वातंत्र्य संग्रामातील सावरकर कुटुंबातील यशोदाबाई गणेश (बाबाराव) सावरकर, यमुनाबाई विनायक (तात्याराव) सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या सावरकर घराण्यातील तीन धीरोदात्त स्त्रियांवरील एकपात्री प्रयोग सादर करणाऱ्या कलाकार अपर्णा चोथे हिच्याशी दै. “प्रभात’च्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.

शालेय शिक्षण घेत असताना नाटकाची आवड निर्माण झालेल्या अपर्णाने शालेय स्पर्धा, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. शिक्षणाने ती स्वत: मास्टर्स इन फार्मसी आहे. सावरकर बंधूचा त्याग, पराक्रम आणि कष्ट इतिहासामध्ये नोंदविले आहेत. पण हा त्याग आणि पराक्रम करत असताना त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया कशा जगल्या असतील? हा प्रश्‍न पडतो. पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत त्यांनी पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळली. त्यांच्या त्याग आणि कर्तृत्वामुळे वेगळ्याच उंचीवर त्या पोहोचल्या आहेत. त्यांच्या त्यागाची कल्पना आत्ता आपण जगत असलेल्या सुसज्ज काळात करणे देखील अशक्‍य’ आहे. मात्र त्यांचा इतिहास अज्ञात आहे. त्यामुळे हा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्‍यतक आहे. या भावनेने या तिघींवर आधारित “त्या तिघी… स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा” हा एकपात्री प्रयोग सादर करता येईल अशी संकल्पना सुचली, असे अपर्णा म्हणाली.

माझे आजोळ भगूर (सावरकरांचे जन्मस्थान) त्यामुळे लहानपणापासूनच सावरकरांबद्दल आदर आणि श्रद्धा होती. जेव्हा मी डॉ. शुभा साठे यांची “त्या तिघी” ही कादंबरी वाचली, तेव्हा मी डॉ. साठे यांच्या परवानगीने आणि तिघींच्या व्यक्तीमत्त्वांचा अभ्यास करुन या एकपात्री प्रयोगाचे संहितालेखन केले. ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना माझ्या आई वडीलांनी मला पूर्ण पाठींबा दिला. यासह “त्या तिघी’ या कादंबरीच्या लेखिका डॉ. साठे, दिग्दर्शक अजिंक्‍य भोसले, एकपात्रीला संगीत देणारे अजित विसपुते, नेपथ्य आणि वेशभूषा सांभाळणारी अश्‍विनी चोथे-जोशी आणि संपूर्ण टीमने मला प्रचंड सहकार्य केले. या सर्वांच्या साथीमुळेच संकल्पना ते सादरीकरण हा टप्पा पूर्ण करू शकले, अशी भावना अपर्णाने व्यक्त केली.

– कल्याणी फडके

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×