तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान

श्रीक्षेत्र देहूगाव – श्रीक्षेत्र देहूनगरीतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढी वारीसाठी पालखीचे सोमवारी (दि. 24) प्रस्थान होणार आहे. भक्‍तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 334 वे वर्ष आहे. यानिमित्ताने देहूत पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. देहुनगरीत ग्यानबा-तुकारामाचा अखंड जयघोष सुरू आहे. सर्वत्र हरिनाम आणि भागवत धर्माच्या पताकांचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पावसाच्या आगमन झाले आणि वातावरणात गारवा पसरल्यामुळे भाविकही सुखावले. इंद्रायणी नदीकाठ, मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे.

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सोमवारी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था, भाविकांना सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.