पावसाने सातारा, कराडला झोडपले

ग्रामीण भागातही मुसळधार : जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार हजेरी

कराड – अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी दुपारी कराड शहरासह तालुक्‍याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच पावसाची वाट पाहून शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली
आहे.

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणीही उशिरा केल्या होता. मात्र जून महिन्यातील वीस तारीख ओलांडली तरी पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्‍त होत होती. दुबार पेरणीचे संकट ओढावणार की काय अशी शंका व्यक्‍त होत होती. मात्र रविवारी दुपारी अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

रविवारी सकाळपासूनच हवेत मोठा उष्मा जाणवत होता. बाहेर फिरणेही अशक्‍य झाले होते. उकाड्याने सर्वजण हैराण झाले होते. गेले दोन ते तीन दिवस सातारा, पुणे, कोल्हापूर भागात पडत असणाऱ्या पावसाने कराड तालुक्‍याकडे पूर्णत: पाठ फिरवली होती.

मात्र रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान आकाशात ढग दाटून येवून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पडलेल्या या धो-धो पावसामुळे हवेत सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी घरी बसूनच पावसाचा आनंद लुटला. दरम्यान, रात्री सात वाजल्यापासून सातारा शहरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.