कारमध्ये आढळले पाच लाख

योग्य पुरावे दिल्याने रक्‍कम दिली परत

मंचर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी अवसरी खुर्द, चांडोली फाटा येथे करण्यात आली. यावेळी एका वाहनाच्या मागील डिकीत पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली. वाहन मालकाने रकमेचे योग्य पुरावे दिल्याने त्यांना रक्कम परत देण्यात आली.

आंबेगाव तालुका हा शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे तर शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर डॉ.अमोल कोल्हे हे पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंबेगाव तालुक्‍यातील बागायती भाग म्हणून ओळखला जाणारा अवसरी खुर्द, चांडोली या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली.

पैशांचा गैरवापर आणि मतदारांना पैशाचे आमिष दाखवू नये, म्हणून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अवसरी खुर्द निवडणूक विभागाचे पथक अधिकारी नारायण पवार, मंचर पोलीस ठाण्याचे एम. बी. लोखंडे, आर. एस. तनपुरे, एच. के. शिंदे यांनी वाहनांची तपासणी केली. सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याने चारचाकी वाहन मालकाकडे मोठ्या रकमा असतात. पोलिसांच्या तपासामुळे शेतकऱ्यांना पोलिसांचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाबरोबरच निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखवू नये, यासाठी निवडणूक अधिकारी आणि पोलीस यंत्रणेद्वारे वाहन तपासणी सुरु राहणार आहे. वाहनांत मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्यास व त्याचे योग्य पुरावे न दिल्यास पैसे जप्त केले जातील, असा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.