एक झाड तोडण्याचा खर्च तब्बल साडेतेरा हजार

माहिती अधिकारातून उघड ः आरेतील वृक्षतोडीवर कोट्यवधीचा खर्च
मुंबई :  आरेतील मेट्रो कारशेडसाठी दि. 4 ऑक्‍टोबर ते 6 ऑक्‍टोबर या तीन दिवसांमध्ये तब्बल दोन हजार 11 झाडे तोडण्यात आली. यासाठी तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक झाड तोडण्याचा खर्च हा 13 हजार 434 रुपये इतका आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी यासंदर्भातील माहितीची एमएमआरसीएलकडे माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरेमध्ये 4 ऑक्‍टोबरच्या रात्री मेट्रो कारशेडसाठी दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आली होती. रात्रीतून झालेल्या झाडांच्या कत्तलीवर संतप्त होत पर्यावरणप्रेमींनी मोठे आंदोलनही केले. मात्र, आता या वृक्षतोडीबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार 4 ऑक्‍टोबर ते 6 ऑक्‍टोबर या तीन दिवसांमध्ये दोन हजार 11 झाडे तोडण्यात आली.

यासाठी तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक झाड तोडण्याचा खर्च हा 13 हजार 434 रुपये इतका आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार नवीन लावलेले एक झाड जगवताना तीन वर्षांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एमएमआरसीएलने झाडे तर तोडलीच. शिवाय त्यावर वारेमाप पैसाही खर्च केला, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे. माहिती अधिकारात एका महिन्याच्या आत उत्तर मिळणे अपेक्षित असताना दोन महिन्यांनंतर ही माहिती प्राप्त झाली. त्यामुळे एमएमआरसीएलच्या पारदर्शकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.