इंदापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची पाहणी

पाणी जपून वापरण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

रेडा- माळवाडी नं. 2 येथील उजनी जलाशयातून इंदापूर शहराला नवीन व जुन्या जॅकवेल पाणीपुरवठा योजनेतून होत असलेल्या सध्य परिस्थितीच्या पाणीपुरवठ्याची पाहणी इंदापूर नपरिषदेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अत्यंत उष्ण समजला जाणारा मे महिना सुरू आहे.उजनी जलाशयात उणे 34 टक्‍के पाणीसाठा असल्याने जॅकवेल पासून ही पाणीपातळी खूपच दूर गेलेली आहे.

विद्युतपुरवठा खंडित होणे ते विविध समस्यांना इंदापूर नगरपालिकेस सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीत देखील शहराला नियमित पाणीपुरवठा कसा होईल या पार्श्‍वभूमीवर इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहदेव व्यवहारे, नगरपरिषदेचे कर्मचारी अंकुश बोराटे, सुरेश सोनवणे, अल्ताफ पठाण यांच्यासमवेत त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कार्याची पाहणी करून शहराला योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना केल्या.

अंकिता शहा म्हणाल्या की, जॅकवेल पासून पाणी पातळी खूपच दूर गेली आहे. पावसासाठी अजून एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाणी पातळी उणे झाल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी उस्फूर्तपणे वृक्षरोपणाचे कार्य हाती घ्यावे. पाण्याची गळती रोखून सांडपाणी टाळावे. पाणी पुर्नवापराचे तंत्र आत्मसात करावे. आपली ही सामूहिक जबाबदारी असून यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. सहदेव व्यवहारे म्हणाले की, उजनी जलाशयातील पाणी मोटार पंपाच्या साह्याने तीन ठिकाणाहून उचल पाणी करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीसाठा कमी असून सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडल्यानंतर हा साठा अधिकच कमी राहणार असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.