इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांत आंदोलनाची वज्रमूठ

प्रत्येक व्यक्‍तीकडून एक रुपया मदत जमा करणार : 39 वर्षांपासून झुलता प्रश्‍न

निमसाखर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्टयातील 22 गावांतील शेतकऱ्यांचा बारमाही पाण्याच्या प्रश्‍न गेल्या तीन पिढ्यांपासून प्रलंबित आहे. गेली 39 वर्षे येथील शेतकरी बारमाही पाण्यासाठी लढा देत आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी आर्थिक साहाय्य जमा करण्यात येणार आहे. 22 गावांतील पाणीप्रश्‍नांसाठी शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे. यासाठी या गावांतील प्रत्येक व्यक्‍तीकडून एक रुपया या प्रमाणे मदत जमा करून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, सूर्यकांत रणवरे यांनी शेतकऱ्यांना संघटीत होण्याचा निर्धार केला आहे.

इंदापूर तालुक्‍यातील फाटा क्रमांक 1 ते 46 तर खाली शेटफळ तलावावर बारमाही पाणी आहे. मात्र, फाटा क्रमांक 47 ते 59 येथील शेतकरी बारमाही पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे 1971 मध्ये 22 गावांच्या बारमाही पाणी प्रश्‍नाला वाचा फुटली. त्यातून शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभे राहिले आहे. 1972 च्या दुष्काळात आंदोलन थोड स्थिरावले. मात्र, नंतरच्या काळात पुन्हा जोमाने आंदोलन सुरू केले. सुरुवातीला परिसरात फक्‍त 200 एकर ऊस होता. सध्या 4 हजार एकर इतके ऊस लागवडीखालील आहे.

22 गावांना पाणी देण्यासाठी (स्व) खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी शेळगाव कट योजना तयार केली. यामध्ये कडबणवाडी येथे पाणी साठवण करून ते पाणी 54 फाट्यात सोडायचे, अशी जवळची योजना होती. मात्र, नंतर ही योजनाच बदलून शरद पवारांनी शेळगाव कट याऐवजी सणसर कट योजना नव्याने तयार केली. योजनेमध्ये अकोला येथे फाटा काढून तो नीरा डावा कालव्याला मिळवायचा. सणसर कटचे पाणी आणि भाटघरचे पाणी, असे एकूण 8.9 टीएमसी पाणी 22 गावांना बारमाही द्यायचे मंजूर केले.

दि. 9 ऑगस्ट 1994 रोजी हा दिवस 22 गावांतील शेतकऱ्यांचा क्षणीक आनंदाचाच दिवस ठरला. या दिवशी निमगाव-केतकी येथे शरद पवार यांनी शेतकरी मेळावा घेतला. त्यामध्ये 22 गावांना बारमाही पाणी दिल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या टाळ्या मिळविल्या. ऊस लागवडीचे आवाहन केले. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही.
1995 मध्ये कॉंग्रेसचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. आणि युतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यावेळी सत्तेत माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे मंत्री झाले. 1996 मध्ये ऊस पिकासाठी सात नंबरवर पाणी दिले. मात्र, सात नंबरवर पाणी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करणारी ठरली. सात नंबरवरील पाणी जर मिळाले नाही. तसेच पिके जळाली तर शेतकरी कोर्टात जाऊ शकत नाही. त्यामुळे 22 गावांतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.

  • 22 गावांतील पाणीप्रश्‍नांसाठी जन आंदोलन पुढील काळात जोमाने वाढवणार आहे. हे आंदोलन उभारले नाही तर भविष्यात 22 गावांचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे जनआंदोलन ही शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत आहे. या लढ्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळासाठी प्रत्येक व्यक्‍तींकडून एक रुपया याप्रमाणे आर्थिक मदत जमा करुन आंदोलन छेडणार आहे.
    – सूर्यकांत रणवरे, निमसाखर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.