डीएचएफएल कंपनीचे कर्जदात्या रोखेधारकांना आश्वासन
नवी दिल्ली :डीएचएफएल गेल्या आठवड्यात 850 कोटी रुपयांच्या रोख्यावरील व्याज दिलेले नाही. त्यामुळे बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्राच्या भांडवल परिस्थितीबाबत शंका निर्माण झाली आहे. मात्र डीएचएफएलने आज सांगितले की पुढील सात दिवसात आम्ही हे देणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या संबंधातील सर्व माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल असे या कंपनीने म्हटले आहे. या कंपनीचे पत मूल्यांकन काही संस्थांनी गेल्या आठवड्यात कमी केल्यानंतर या कंपनीच्या आणि इतर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरवर बराच परिणाम झालेला आहे.
दरम्यान डीएचएफएल संदर्भातील घडामोडीनंतर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था समोरील भांडवलाची परिस्थिती खरोखरच बिघडलेली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे फिट्च या संस्थेने म्हटले आहे. बॅंकांमधील भांडवलाची परिस्थिती तुलनेने बरी आहे . त्यांच्यावर अनुत्पादक मालमत्तेचा बराच बोजा असूनही नागरिक बॅंकांतून ठेवी काढून घेण्याची घाई करीत नाहीत. मात्र त्या तुलनेत बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांची परिस्थिती बरीच बिघडलेली आहे. गेल्या वर्षी आयएल अँड एफएस मध्ये झालेल्या घडामोडींनंतर आता आणखी एका बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थेसमोर वेळेवर देणे न देण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रिझर्व्ह बॅंकेने या घडामोडींची दखल घेऊन वित्तीय स्थिती स्थिर राहील याची काळजी घेण्यात येईल असे सांगितलेले आहे.
दरम्यान आयएल अँड एफएसच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्जमंजुरीसाठी अयोग्य मार्गाचा वापर केला असल्याचे चौकशीतून दिसून येत आहे. गंभीर गुन्हे चौकशी विभागाने संबंधित अधिकाऱ्याचे ईमेल तपासले असता अनेक गैरव्यवहार आढळून आले आहेत. कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी परदेश वाऱ्या, खासगी विमानाचा प्रवास, हेलिकॉप्टरचा प्रवास असे प्रकार केल्याचे आढळून आले आहे.