आर्वीच्या घटनेचा न्याय नक्की होईल – माजीमंत्री ढोबळे

मातंग समाजाच्या चिमुकल्यावर झालेल्या कृत्यांचा इंदापुरात निषेध

रेडा – राज्यातील मातंग समाजातील तरुणांनी एकत्र येऊन उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी तरच समाजावर होणारे हल्ले थांबतील. आर्वी शहरात चिमुकल्यावर झालेल्या हल्ल्याला वाचा फोडण्यासाठी वेळ पडलीच तर विष्णूपंतांचा सल्ला घेऊ. या घटनेचा प्रतिकार करू, असे राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.

आर्वी येथील घटनेच्या निषेधार्थ अखंड महाराष्ट्रात बहुजन समाजात संतापाची लाट उसळली. याबाबत माजी मंत्री ढोबळे यांनी इंदापूर येथे समाजबांधवांपुढे निषेध व्यक्त केला. उपेक्षितांनी अन्याया विरोधात एकत्र यावे, शिक्षीत व्हावे, लढा द्यावा असे सांगून ढोबळे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील 8 वर्षीय चिमुकला आपल्या वस्तीत असलेल्या जोगणा मंदिरात खेळायला गेला. म्हणूून त्या चिमुकल्यास मारहाण करीत त्याची पॅण्ट काढून त्याला उन्हात गरम झालेल्या टाईल्सवर बसविणे, हे अखंड माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. याबाबत मुलाच्या आईने आरोपीला हटकले असता तीलाही आरोपीने शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलाचे वडील गजानन मधुकर खडसे यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल तसेच अटक करण्यासही पोलीसांनी वेळ लावला. हा कारभार मोगलाई नाही का? असा सवालही ढोबळे यांनी उपस्थित केला.

माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, आर्वी हे गांधींच्या जिल्ह्यातले माणुसकीचे गाव समजले जाते. याच गावांमध्ये ही घटना घडली. एखाद्या मागास कुटुंबावर अत्याचार झाला तर पोलीस अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी. संबंधीत कुटुंबाला संरक्षणही द्यायचे असते. परंतु, आर्वी गावात घडलेल्या घटनेत सुरवातीला असे काही दिसले नाही. समाज संघटनांनी ज्यावेळी निषेधाचे, आंदोलनाचे हत्यार उपसले त्यानंतर पोलीस प्रशासनाची पळापळ झाली. हे दुर्देवी आहे. आर्वीची अमानुष घटना अवघ्या मानवी मुल्यांची राख करणारी असून पशुलाही लाजवणारी आहे. समाजातल्या तरुणांनी एकत्र येऊन अशा घटनांना तीव्र विरोध करणे गरजेचे आहे. आजही, दलितांना अत्याचाराला समोरे जावे लागते, हे ऐकून आणि पाहून मन करपते. मुठी आवळल्या जातात. जळगावला याच समाजातील लोकांना पाण्यात बुडवले तर भूत मांगे कुटुंबाला नागवी करून मारले. भुते गावच्या भुताटकीने अवघ्या कुटुंबाची राख केली. लातूरला लग्नाचे आखे वऱ्हाडच गावाबाहेर हाकलून लावले. आणि आर्वी गावातील घटनेने अत्याचाराचा कळसच गाठला, असे सांगून ढोबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

वर्धा जिल्ह्यातील घटने बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून याबाबतचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. यातूनच यासंदर्भात जे काही तातडीने करता येईल, ते-ते करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या घटनेबाबत गुन्हा दाखल होवून आरोपीलाही अटक झाली, यात समाधान आहे. समाजाने अशा घटनां विरोधात एकीने आवाज उठवावा.
– लक्ष्मणराव ढोबळे, माजीमंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here