सहायक अभियंतापद नऊ महिन्यांपासून रिक्त

शिक्रापूर येथील विद्युत वितरण विभागातील प्रकार

शिक्रापूर – येथील विद्युत वितरण विभागातील सहायक अभियंता पद गेली नऊ महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी येत असून नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी वेळ लागत असून लवकरात लवकर सहायक अभियंता नेमण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

शिक्रापूर हे शिरूर तालुक्‍यातील महत्त्वाचे गाव असून येथे असलेल्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाअंतर्गत अनेक गावे येतात. सध्या असलेले विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी व अधिकारी येथील येथील लोकसंख्येच्या दृष्टीने कमी पडत आहेत. येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात दररोज नागरिकांच्या शेकडो तक्रारी येत असतात. येथील वाढते नागरीकरण व औद्योगिकिकरण यावेळी येथे कामकाज देखील जास्त असते. येथे नवीन मीटर घेणे, विद्युत बिल दुरुस्त करणे, नवीन बिल काढणे, मीटर दुरुस्ती करणे यांसह आदी तक्रारींसाठी दररोज शेकडो नागरिक व शेतकरी येत असतात.

परंतु येथील कार्यालयात सहायक अभियंता अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असते. येथील सहाय्यक अभियंता अभिजित बिरनाळे यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागेवर अतिरिक्त म्हणून किरण चोधे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे; परंतु चोधे यांना त्यांच्या विभागाचे कामकाज पाहून येथील कार्यालयाचे कामकाज पाहणे शक्‍य होत नसल्यामुळे कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. विद्युत वितरण कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिक्रापूरसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या गावामध्येच कार्यालयातील मुख्य अधिकारी नऊ महिन्यांपासून उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात अधिकारी नसल्यामुळे विलंब लागत आहे. त्यामुळे शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयामध्ये कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये नव्याने अधिकारी नियुक्त होताच शिरूर तालुक्‍यामध्ये दोन सहायक अभियंता पदे नेमण्यात येणार आहेत. त्यावेळी शिक्रापूर कार्यालयासाठी रिक्त असलेल्या जागेवर एक सहायक अभियंता नेमण्यात येईल.
– नितीन महाजन, कार्यकारी अभियंता

Leave A Reply

Your email address will not be published.