घोड धरणाने गाठली नीचांकी पातळी

250 पाणीयोजना संकटात

निमोणे -चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाच्या पाण्याने तळ गाठला असून जून महिना संपत आला तरीही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बारमाही बागायती शेती असणारी गाव म्हणून शिंदोडी, चिंचणी या गावांची ओळख असून आज मात्र या गावांची अवस्था “धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच झाली आहे.

घोड धरण झाल्यापासून 51 वर्षांत पहिल्यांदाच एवढा पाणीसाठा कमी झाला असल्याचे जाणकार सांगतात. घोड धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सात टीएमसी एवढी असून या धरणातून जवळपास 250 पाणी पुरवठा योजना जात आहेत. दोन कालव्यांद्वारे श्रीगोंदा तालुक्‍यातील लाखो हेक्‍टर शेती सिंचनाखाली आलेली आहे; परंतु दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पावसामुळे दरवर्षी धरणाची पाणी पातळी तळ गाठत आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. शिंदोडी येथील ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, घोड धरणात शिंदोडी गावची जवळपास 1700 एकर जमीन गेली असून शिंदोडी गावातील अनेक शेतकरी भूमीहीन झाले आहेत. घोड धरणाचा मृत पाणीसाठा हा ज्या गावांच्या जमिनी घोड धरणात गेल्या आहेत. त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. यावर्षी घोड धरण 100 टक्के भरलेलं असतानाही शिरुरच्या राजकीय लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे श्रीगोंदा तालुक्‍यातील पुढाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे यापुढे घोड धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात दर वर्षी शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here