अबाऊट टर्न: समानता

हिमांशू
“दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है…’ मोबाइल फोन आणि इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स सोडाच; पण टीव्हीही ज्या काळात फारसे नव्हते, त्या काळातलं हे सुपरहिट गाणं. पहिल्या तारखेचा महिमा वर्णन करणारं किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं रेडिओवर दर महिन्याच्या एक तारखेला लागायचंच… आणि फक्‍त एक तारखेलाच लागायचं. “पहली तारीख’ नावाच्या चित्रपटातलं हे गाणं त्याकाळी पडद्यावर सगळ्यांनी एक तारखेलाच पाहिलं असेल असं नाही. चित्रपट एक तारखेला प्रदर्शित झाला होता की नव्हता, हेही ठाऊक नाही. पण एक तारखेला रेडिओवर या गाण्याची वाट पाहणारे अनेकजण होते.

एक तारखेची जादूच तशी! सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी ही तारीख. कुटुंबातल्या सर्वांनी एक तारखेसाठी आपापली स्वप्नं रंगवून ठेवलेली असायची. त्याचं वर्णनही या गाण्यात चपखल केलंय. मध्यमवर्गीय, नोकरदारांच्या पगाराचा हा दिवस. अर्थात, ही परिस्थिती आता फारशी दिसत नाही. मध्यमवर्गीयांमधला एक गट उच्च मध्यमवर्गात किंवा नवश्रीमंत वर्गात गणला जाऊ लागलाय. त्यांचा खिसा महिनाभर गरम असतो. दुसरीकडे, निम्न मध्यमवर्गीयांसाठी एक तारखेलाही “महिनाअखेर’ असते. कुणाच्याही मागणीला नकार देण्यासाठी पूर्वी “महिनाअखेर आहे,’ असं कारण देताना कुणी लाजत नसे. आता विविध कारणांनी महिनाअखेर आणि एक तारीख या दोहोंचं माहात्म्य जरा कमी झालंय.

मोबाइल बॅंकिंग, ऑनलाइन खरेदी वगैरे कारणांबरोबरच सर्वांच्याच पगाराची तारीख एक नसते, हे एक महत्त्वाचं कारण आहे. वाढत्या शहरीकरणानं आणि औद्योगीकरणानं एक तारीख हा पगारदार समाजाचा “लसावि’ आहे, हे समीकरण मोडून टाकलं. कामकाजाची क्षेत्रं वाढली, खासगी संस्था आणि कंपन्या वाढल्या. सगळ्यांचा पगाराचा दिवस वेगवेगळा! कुणाचा एक तारखेला, कुणाचा सात तारखेला, तर कुणाचा दहा तारखेला! आता मात्र एक तारखेचं (किंवा कुठल्यातरी “एकाच’ तारखेचं) महत्त्व पुन्हा एकदा वाढेल, अशी शक्‍यता निर्माण झालीय.

संस्था, कंपनी खासगी असो वा सरकारी, सगळ्यांनी नोकरदारांना एकाच तारखेला पगार द्यायचा, असा नियम करणारं विधेयक सरकार संसदेत मांडणार आहे. सध्या आपल्याला मित्राच्या पगाराचा दिवससुद्धा माहीत नसतो. खिसा थंडावलेला असताना उधारी-उसनवारी करायची झाल्यास, मित्राच्या पगाराची तारीख माहीत नसणं, हा माहितीच्या युगाचा अपमान आहे. काही घरांमध्ये तर पती-पत्नी दोघेही कमावणारे असतात; पण दोघांनाही एकमेकांच्या पगाराची तारीख माहीत नाही, अशीही उदाहरणं अलीकडे सापडतात. ही अगदीच अतिशयोक्‍ती वाटत असली, तरी आपल्या पतीला किंवा पत्नीला किती पगार मिळतो, हे माहीत नसणारे अनेकजण आहेत. आता किमान पगाराची तारीख तरी सगळ्यांना माहीत असेल.

देशभरात अनेक बाबतीत समानता आणण्याच्या प्रयत्नांमधला हा महत्त्वाचा टप्पा आहे, हे निःसंशय. मात्र, “समान काम; समान मोबदला’ ही समानता अधिक महत्त्वाची. आजही अनेक ठिकाणी एकच काम पुरुषाने केलं तर अधिक मोबदला आणि स्त्रीने केलं तर कमी मोबदला दिला जातो. काही ठिकाणी तर राजरोस बालमजूर वापरले जातात. पगाराचा दिवस समान असावाच; पण पगारदार होण्याचं स्वप्न डिग्र्यांच्या भेंडोळ्यांसह गळ्यात अडकवून फिरणाऱ्यांना काम मिळणं अधिक महत्त्वाचं!

Leave A Reply

Your email address will not be published.