चर्चेत: इलेक्‍ट्रॉनिक मीडियाने संयम बाळगावा

जगदिश देशमुख

माहिती देण्यासाठी बातमी दाखवण्याऐवजी, प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून बातम्या दाखवल्या की, काय होते याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांतील इलेक्‍ट्रॉनिक मीडियातील पत्रकारिता पाहून येतो. ब्रेकिंग न्यूजच्या नादात फेक न्यूज दाखवणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक मीडियाने आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा खून करतोय, याचाही विचार करू नये, ही खरंच शोकांतिका आहे.

जवळजवळ सर्वच न्यूज चॅनल्सनी गेल्या काही दिवसांतील सत्तासमीकरणाच्या बातम्या दाखवताना जे काही पराक्रमी कृत्य केलंय, ज्या काही “कन्टेटलेस’ बातम्या दाखवल्यात, पत्रकारितेच्या नावाला काळिमा फासण्याचे जे काम केले आहे. ते सगळं लोकशाहीतील चौथ्या स्तंभाला मारक आहे. शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा पत्र मेल केले आहे, तुमचाच मुख्यमंत्री होणार म्हणून त्या पक्षाच्या आमदारांना पुरणपोळ्या वाटायला लावणे, मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी कधी होणार? याचीसुद्धा बातमी दिली. ते सर्व खोटे निघाले.

एका नेत्याच्या रागावलेल्या, पडलेल्या चेहऱ्यावरून गाठलेला स्वर्ग, राष्ट्रपती राजवटीची भीती घालणे, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार म्हणून मनातल्या बातम्या देणे. नेत्याच्या ऑपरेशन थिएटरला न्यूज स्टुडिओ बनविणे, न्यूज चॅनलवरचा विश्‍वास उडायला ह्या बातम्या कमी पडतील म्हणून की काय, विधानसभा निकालाच्या दिवशी आम्हीच न. 1 होतो, हे पुढील 10-12 दिवस चॅनलवर दाखवत दोन-दोन चॅनल दावा करतात तेही आकडेवारी दाखवून आणि इतका खोटारडेपणा करूनही कुठलाही न्यूज चॅनल प्रेक्षकांची माफी मागायला तयार नाही. न्यूज चॅनलनी प्रिंट मीडियाकडून काहीतरी शिकावे. त्यांची बातमी जाऊ द्या, संदर्भ जरी चुकला तरी दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर ठळक अक्षरात दिलगिरी व्यक्‍त करतात. त्याशिवाय विश्‍वासार्हता वृद्धिंगत होत नाही.

न्यूज चॅनल फेक बातम्यांच नाही तर अर्थहीन, संदर्भहीन बातम्याही दाखवतात. तरी इलेक्‍ट्रॉनिक मीडियाला लाज ना लज्जा. कुठल्याही चॅनलच्या संपादकाने झालेल्या चुकीच्या वृत्तांकनाबद्दल माफी तर मागितली नाहीच निदान हेडर किंवा फूटरला एखादी टाईप केलेली ओळ तरी चालवायची. पण तितकीशी तसदीही कुठल्याही चॅनलच्या संपादकांनी दाखवली नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूजच्या नादात चुकीची बातमी दाखवली. त्याबद्दल माफी मागतो पण तरीही ब्रेकिंग न्यूजसाठी तुम्ही आमचंच चॅनल पाहा. असं माफी मागता मागता आवाहनही करता आले असते. खरंतर हे सगळे कशासाठी चाललंय तर, फक्‍त टीआरपीसाठी, आम्हीच न. 1 आहोत हे दाखवण्यासाठी. सर्वसामान्य भाबड्या वाचकांना प्रश्‍न पडला असेल आम्हीच न. 1 आहोत ह्यासाठी इतका आटापिटा कशाला.

तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो. आम्हीच न. 1 आहोत ह्यातच खरी गोम आहे. सगळे आर्थिक तत्त्वज्ञान ह्या एका नं. 1 जवळ अडकून पडले आहे. एकदा का बाजारामध्ये अमुकअमुक चॅनल न. 1 आहे, तेच चॅनल जास्तीत जास्त लोक पाहतात हे का पसरले की, जाहिरातीचा ओघ त्याच चॅनलकडे जातो. एकदा का जाहिरातींचा ओघ त्या चॅनलकडे येऊ लागला की, मग आनंदीआनंद. कुठलेही न्यूज चॅनल हे चालवणे मोठे जिकिरीचे काम आहे. न्यूज चॅनल म्हणजे पांढरा हत्ती. भरमसाठ खर्च एक न्यूज चॅनल चालवायला येतो. त्यामानाने उत्पन्न काय तर फक्‍त जाहिराती. त्यात फुकट असणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या सोशल मीडियाने न्यूज चॅनलची गोची करून टाकली आहे.

जिल्हानिहाय, तालुकानिहाय बातम्या देणारे यू ट्यूब चॅनल आहेत. जनतेला आपल्या गावातल्या बातम्या बघायला आवडतात. ते ह्या लोकल यू ट्यूब चॅनलवर बघायला मिळतात. त्यामुळे जनता आता मेन स्ट्रीम मीडियातील बातम्या टीव्हीवर बघत नाही, परिणामी मेन स्ट्रीम मीडियाचा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की, महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून न्यूज चॅनलची जी बातम्या मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे, कन्टेन्टलेस चुकीच्या बातम्या दाखवल्या जातात त्या का दाखवल्या जातात. एका पक्षाचा नेता चॅनलसमोर येऊन ऍक्‍टिंग करतो आणि चॅनल त्याचीच ब्रेकिंग न्यूज दिवसभर चालवतात आणि तो नेता मात्र तिकडे गुपचूप पक्षाच्या मिटींगला जातो. त्या नेत्याची किंबहुना कुठल्याही राजकीय नेत्याची प्रिंट मीडियासोबत अशी वागण्याची हिम्मत आहे का?

राजकीय व्यक्‍तींना मीडियाची गरज वाटली पाहिजे, तसे न वाटता मीडियालाच राजकीय व्यक्‍तींची जास्त गरज आहे असे राजकीय व्यक्‍तींना वाटते. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक मीडियाची अशी वाताहत झाली आहे. इलेक्‍ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या पत्रकारांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे नेमकी आपली लोकशाहीतील भूमिका काय आहे. आपण कुठल्या बातम्या दाखवल्या पाहिजेत. नव्हे तर यापुढे जाऊन आता मीडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनाच नैतिकतेची शपथ घेऊनच मीडियामध्ये काम करण्यासाठी घेतले पाहिजे, बातमी दाखवताना ते जनतेच्या मानसिकतेचा विचार करत नाही तर लोकशाहीतील चौथ्या स्तंभाचे आपण पाईक आहोत आणि तो कसा अधिक मजबूत होईल हा विचार करून बातम्या बनवल्या पाहिजेत, जनतेपर्यंत नेल्या पाहिजेत. अजूनही वेळ गेली नाही ह्या चक्रव्यूहातून इलेक्‍ट्रॉनिक मीडियाला बाहेर पडण्यासाठी वेळ आहे. आता त्यातून बाहेर पडायचं की, त्याच दलदलीत अडकून पडायचं हे त्यांच्याच हातात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.