अतिक्रमण कारवाईत लोकप्रतिनिधींची लुडबूड

आळंदीतील मरकळ रस्त्यावरील अतिक्रमण न काढण्याचे फोनवर दिले निर्देश

आळंदी – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. 25) प्रस्थान ठेवणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर लाखो वैष्णव आळंदीत दाखल होत आहेत. या वैष्णवांना कोणतीही समस्या उद्‌भवू नये यासाठी आळंदी नगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण हाटाव मोहीम सुरू आहे. परंतु, शनिवारी (दि. 22) अतिक्रमण विभाग मरकळ रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता येथील विक्रेत्यांनी थेट एका बड्या लोकप्रतिनिधींना फोन लाऊन अतिक्रमण न काढण्याची मागणी केली. त्यांनी ती तात्काळ मंजूर करीत अतिक्रमण विभागास अतिक्रमण न काढण्याचे आदेश दिल्याने आम्ही हे अतिक्रमण हटविले नसल्याचे आळंदी नगरपरिषद अतिक्रमण विभाग प्रमुख तसेच उपमुख्य अधिकारी राम खरात यांनी सांगितले.

पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून संपूर्ण आळंदी शहरातील पदपथावरील अतिक्रमणे आळंदी नगरपरिषदेच्यावतीने काढण्यात आली त्यामुळे रस्ते, पदपथ, चौकांनी खऱ्या अर्थाने मोकळा श्‍वास घेतला आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत अनवाणी पायाने होणारी नगर प्रदक्षिणा ही सुखकर होणार आहे. त्यासाठी आळंदी नगरपरिषद अतिक्रमण विभाग तसेच राम खरात यांच्या प्रयत्नातून कोणाचीही गय न करता सर्व अतिक्रमणे काढण्यात आली, मात्र अंतिम टप्प्यातील म्हणजेच मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी माता चौक पाण्याच्या टाकीजवळ संतोषी माता मंदिरापर्यंत उजव्या बाजूकडील पदपथावर (फुटपाथ) असणारी छोटी मोठी व्यावसायिकांच्या टपऱ्या हातगाड्या लोखंडी स्टॉल व इतर मार्गाने अडवली जागा मोकळी करण्यासाठी शनिवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. त्यावेळी तेथील एका विक्रेत्याने लोकप्रतिनिधींना फोन लावून सांगितले की, आळंदी नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व अतिक्रमण पथक आमची दुकाने काढण्यासाठी आली आहे तरी आपण त्यांना सांगावे की, ही दुकाने “जैसे थे’ ठेवावीत. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी फोनवर म्हणाले की, या दुकानांवर गोरगरिबांची पोटे चालतात त्यामुळे तुम्ही अतिक्रमण काढू नका, असे आदेश दिल्याने अतिक्रमण न काढताच आमचे पथक माघारी फिरल्याचे खरात यांनी सांगितले. दरम्यान, अतिक्रमण न काढण्याचे आदेश थेट लोकप्रतिनिधी देत असतील तर अतिक्रमणधारकांवर राजकीय हस्तक्षेप असण्याच्या आरोपावर आता या लोकप्रतिनिधींच्या या कृतीमुळे शिक्‍कामोर्तब झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेली माऊली मंदिरासह शहरातील विविध ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी कोणीही मध्यस्थी केली नाही मात्र, मरकळ रस्त्यावरील अतिक्रमण न काढण्यासाठी बड्या लोकप्रतिनिधींनी फोनवरून मध्यस्थी केल्याने रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली हे आळंदीचे पहिलेच उदाहरण म्हणावे लागेल. तसेच कोणाच्या दबावाला बळी न पडता अतिक्रमण काढा असे आदेश नगराध्यक्षांचे असल्याने रविवारी (दि. 23) मरकळ रस्त्यावरील ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.
– राम खरात, उपमुख्यअधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख, आळंदी नगरपरिषद

Leave A Reply

Your email address will not be published.