छावणी चालकाविरोधात शेतकऱ्यांचा पाथर्डीत मोर्चा

पाथर्डी -जनावरांच्या छावणीत असलेल्या आमच्या जनावरांना छावणी चालक चारा देत नसून, जनावरांना जे पाणी दिले जाते, तेही दूषित असल्याने आमची जनावरे जगवायची कशी, असा प्रश्‍न उपस्थित करत तालुक्‍यातील चेकेवाडी व धनगरवाडी येथील छावण्यांत जनावरे असलेल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

आज चौथ्या शनिवारची सुटी असल्याने त्यांना कोणीही अधिकारी न भेटल्याने पुन्हा सोमवारी (दि.24) आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चेकेवाडी व धनगरवाडी येथील जनावरांची छावणी ही छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था चालवत असून, या छावणीत आम्ही आमची जनावरे दोन ते तीन दिवसांपासून ठेवली आहेत.

छावणी चालक आमच्या जनावरांना चारा देत नसून, आमच्या जनावरांना चारा द्या, यासाठी त्यांच्याकडे सारखी मागणी करावी लागते. त्यांना मागणी केल्यास ते आम्हाला दमदाटी करतात व छावणीतून निघून जातात, असे सांगतात. त्यामुळे आमची जनावरे उपाशी राहात आहेत. या शिवाय छावणीतील जनावरांना जे पिण्यासाठी पाणी दिले जाते ते दूषित असून, त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व प्रकारची सखोल चौकशी करावी व छावणी चालकावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर धनगरवाडीचे सरपंच बाबासाहेब चितळे, लक्ष्मण वाघ, भाऊसाहेब जिवडे, नवनाथ जिवडे, किसन मोरे, राजेंद्र वाघ, जनार्धन वाघ, महादेव जिवडे यांच्यासह अनेक पशुपालकांच्या सह्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.