पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होईल का?

नागरिकांचा सवाल ः पूर्व हवेली भागात राडारोडा, नाले रस्त्यांवरच

प्रशासनाचे दुर्लक्ष

पूर्व हवेली तालुक्‍यातील बहुतांश भागांमधील नाले व ओढे तुंबले आहेत. पण प्रशासनाने साफसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या नाले व ओढ्यांची पावसाळापूर्वी साफसफाई न केल्यास पावसाळ्यात भीषण परिस्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. त्यातच प्रशासनाने तत्काळ ओढे व नाल्यांवरील केलेली अतिक्रमणे हटवून नाले व ओढ्यांमध्ये साचलेला राडारोडा व कचऱ्याची साफसफाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

फुरसुंगी – भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाळी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी या भागातील बहुतांश नाले व ओढे राडारोडा व कचऱ्याने तुंबले आहेत. पावसाळा जवळ आला तरी नाले व ओढ्यांतील राडारोडा व कचऱ्या अद्यापही साफ केलेला नाही. आता तरी नाले व ओढ्यांतील साचलेला राडारोडा व कचरा पावसाळ्यापूर्वी तरी साफ होणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पूर्व हवेली तालुक्‍यातील फुरसुंगी, भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळीदेवाची, गंगानगर, कचरा डेपो, हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी आदी भागातील नाले व ओढ्यांची साफसफाई न झाल्याने या पावसाळ्यात पावसाचे पाणी जाण्यास जागाच उरली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्ते व घरांमध्ये घुसून जीवितहानी होण्याचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. या भागात नैसर्गिक ओढे-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने ओढ्यांची पात्रे खूपच अरुंद तर काही ठिकाणी ओढ्यांवर स्लॅप किंवा सिमेंटच्या पाईपमधून प्रवाह वळविल्याने येथील ओढ्यातून पाणी जाण्यास जागा नसल्याने सासवड मार्ग, बाह्यवळण मार्ग व अंतर्गत रस्त्यांवरुन वरून तब्बल 5-6 फुटांपेक्षा जास्त उंचीचे पाणी मोठ्या वेगाने पाणी वाहते अशावेळी रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन पुरसदृश्‍य परिस्थिती निर्माण गतवर्षी पावसाळ्यात निर्माण झाली होती.

हवेली तालुक्‍यातील फुरसुंगी, भेकराईनगर, गंगानगर, ऊरुळी देवाची, हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री,पिसोळी, वडकी, कोंढवा, येवलेवाडी आदी शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सरकारी गायरान व सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून सरकारी जागा बळकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामध्ये नैसर्गिक ओढे, नाले ,तलाव बुजविले जात आहेत. नैसर्गिक प्रवाह सोयीस्करपणे वळवून पाण्याचा प्रवाह सिमेंटच्या बंद पाईपमध्ये सोडून त्यावर बांधकाम करुन ओढा-नालाच गायब केल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन नाले व ओढ्यांवरील अतिक्रमणे हटवुन साफसफाई करावी व अतिक्रमणे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती बिकट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)