एन ए जमीन खरेदी करताना… (भाग-१)

प्रत्येकालाच वाटते स्वत:चे हक्काचे घर असावे. जमीन विकत घेऊन त्यावर आलिशान बंगला बांधावा, असे स्वप्न उराशी बाळगणारी असंख्य मंडळी आपल्याला दिसतील. याशिवाय गुंतवणूक म्हणूनही जमीन खरेदी करण्याचा ट्रेंड प्रचलित आहे. गृहप्रकल्पासाठी शहर, महानगरलगतच्या मोकळ्या जमिनीला मोठी मागणी असते. मात्र अशा प्रकारची जमीन खरेदी करताना काही खरेदीदारांसाठी खुले किंवा छुपी आव्हाने असतात. अशा ठिकाणी गुंतवणूक करताना खरेदीदारांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

भविष्यात चांगला फायदा
मिळवण्यासाठी अनेक मंडळी मोकळी जमीन खरेदी करण्याबाबत आग्रही असतात. मात्र, जेव्हा विक्रीची वेळ येते, तेव्हा अचानक अडचणी येतात आणि अपेक्षेपेक्षा कमी भावाने जमिनीची विक्री करावी लागते. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक भागात जमिनीचे भाव बऱ्यापैकी स्थिर राहिलेले आहेत. काही भागात जमिनीचे भाव उतरले आहे. असे असले तरी खरेदीचा मूड अद्याप कमी झालेला नाही. एका अंदाजानुसार काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीचे भाव सध्या दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी उतरले आहेत.

दुसरीकडे काही विकासक प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट्‌समध्ये लक्ष घालत आहेत. अनेक मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या जसे की टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, एस.ए.आर.इ.होम्स, सुपरटेक लिमिटेड गौर ग्रुप, श्रीराम प्रॉपर्टीज आणि हिरानंदानी सारख्या कंपन्यांनी देखील प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्‍टमध्ये पाऊल टाकले आहेत. अशा स्थितीत कंपन्यांकडून प्लॉट विक्रीचा ट्रेंड वाढल्याने जमीन मालकांना देखील चांगले दिवस आले आहेत. ज्या मंडळींनी गुंतवणुकीच्या उद्देशाने जमिनीची खरेदी केली होती, त्यांना चांगला परतावा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे पडत्या किमतीत विकण्याऐवजी आणखी काही काळ भाव वाढण्याची वाट पाहण्यास हरकत नाही. तज्ज्ञांच्या मते, भूखंडांत गुंतवणूक करून अनेक प्रत्यक्ष लाभ पदरात पडू शकतात. या ठिकाणी आवडीच्या रचनेनुसार घराचे बांधकाम करता येते. तसेच गुंतवणूकदारांना भूखंडाच्या किमती वाढल्याचा फायदा घेता येतो. मात्र, एखाद्या जुन्या प्लॉटची निवड करणे आणि तेथे विकासकाच्या मदतीने बंगला उभारणे हा देखील पर्याय राहतो. अर्थात, एन.ए जमीन (नॉन ऍग्रिकल्चरल) खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. व्यवहारातील बारकावे लक्षात घेतल्यास भविष्यात व्यवहारावरून अडचणी येणार नाहीत. यासंदर्भात इथे काही बाबी नमूद करता येतील.

एन ए जमीन खरेदी करताना… (भाग-२)

जमिनीसंबंधीच्या परवानग्या जाणून घ्या
शहरालगत किंवा उपनगरातील कोणत्याही भागात जमीन खरेदी करताना ती जमीन अकृषक (एनए) आहे की नाही, हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. जर ती जमीन एनए नसेल तर ती एका मर्यादेपर्यंत बांधकाम करता येते. अन्यथा ते बांधकाम बेकायदा आहे, असे समजले जाते. शहरात मास्टर प्लॅनशिवाय काही भाग सतत विकसित होत असतात. हा विकास कृषी जमिनीपर्यंत पोहोचतो. कृषी जमिनीमुळे काही प्रकल्प रेंगाळतही पडतात. त्यामुळे जमिनीचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी महसूल कार्यालयात त्या जमिनीची माहिती घ्यावी. कृषी जमीन ही आपल्या शहरालगत असू शकते आणि त्याची किंमतही तुलनेने कमी असू शकते. मात्र, महानगर कार्यालयात जमिनीच्या नोंदणीबाबत अस्पष्टता असेल तर ती जमीन ग्रामीण हद्दीतील देखील असू शकते. काही वेळा उपनगराचा काही भाग हा ग्राम पंचायत हद्दीत असतो. शहराची हद्द आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील जमिनीच्या किमतीत जमीन-अस्मानचा फरक असतो. त्याचबरोबर कृषी जमीन असल्यास परवानगीशिवाय बांधकाम करता येत नाही. अशा वेळी मनासारखे बांधकाम करण्यासाठी लॅंड यूज कन्व्हर्जनसाठी अर्ज करावा लागेल. त्यात बराच खर्च करावा लागतो.

– विठ्ठल जरांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)