दखल: चोरांचा उन्माद मोडून काढण्यासाठी कठोर शासन हवे !

जयेश राणे

चोरीच्या वाढत्या घटना पाहता आज आपण खरंच सुरक्षित आहोत का, असा प्रश्‍न पडतो. चोरी करताना चोर जी शक्‍कल वापरतात ते पाहून डोके चक्रावून जाते. दुकानांच्या व घरांच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी केल्याच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. याचा अर्थ घराला लावलेल्या कुलुपावर किती विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍न समोर येतो.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील एका देशी दारूच्या दुकानात लुटमार करण्यात आली. ती कशा प्रकारे केली. याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. पैशांसाठी लोक काय करू शकतात? याचे हे प्रकरण एक उदाहरण आहे. बेकारी, गरिबी आदी गोष्टी देशात आहेत. हे मान्यच, म्हणून स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याचे डोके फोडणे, त्याला लुटणे हा त्यावरील उपाय कसा असू शकेल? या पद्धतीने जाणाऱ्या क्रूरकर्मा लोकांना कठोर शासन होण्यासाठी विद्यमान कायद्यात काय बदल करता येईल? याकडे लक्ष दिले पाहिजे.

चोरी-लुटमार या घटना प्रतिदिन घडत असतात. या घटनांतील गुन्हेगारांना कठोर शासन होऊ लागले, तर आपसूकच गुन्ह्यांना आळा बसून नागरिकांना चोरट्यांची भीती राहणार नाही. चोरी करणारे भामटे सामान्य व्यक्‍तीपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत कोणालाही आपला इंगा दाखवू शकतात याचे उदाहरण पाहूया. महाराष्ट्र शासनाचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली होती. कल्याण रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. आमदारांसाठी लावण्यात आलेल्या विशेष बोगीमध्ये ही चोरीची घटना घडली. आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

गणपती, मे महिना आदी सुट्टयांच्या कालावधीत सहकुटुंब अनेकजण विशेषतः गावी जात असतात. कोण गावी जात आहे?, कोण इतरत्र कुठे गेले आहे? किती दिवसांसाठी जाणार आहे? अशा गोष्टींची माहिती चोरट्यांना अचूक असते. याचाच अपलाभ उठवत ते घरफोड्या करण्याचे डावपेच आखतात आणि त्यात ते यशस्वीही होतात. सामान्य माणसाच्या घरात किमती वस्तू, मोठी रोकड असणे शक्‍यच नसते. तरीही जे काही हाती लागेल त्यासाठी चोरट्यांची पळापळ चालू असते. चोरी झाल्याचे कळल्यावर साहजिकच कोणालाही धक्‍का बसतो. कारण चोरांच्या हाती काही लागले नाही तरी घरातील साहित्याची नासधूस करून ते पोबारा होतात. पुन्हा ते साहित्य आणण्यासाठी सामान्य माणसाला किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असते? हे अनिश्‍चित असते. चोरीसह याचे दडपण त्याच्यावर असते.

रस्त्यावरील वाहने चोरणारे अत्यंत चलाखीने वाहन पळवून नेतात. त्यामुळे नागरिकांनी आपण कितीही घाईत असलो तरी आपले वाहन सुरक्षित ठिकाणी कसे लावता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. “नजर हटी दुर्घटना घटी’ असे एक वाक्‍य महामार्ग, घाट येथून प्रवास करताना वाचनात येत असते. तसेच येथेही आहे. जेव्हा आपण निष्काळजीपणा करतो तेव्हा त्याचा फटका बसतोच. कारण चोरांना ओळखणे कठीण असते. पण ते मात्र तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. सोनसाखळी चोर, दुचाकीवरून वेगात येऊन हातातील पर्स हिसकावणारे भामटे यांचा बाजारात गर्दीच्या वेळेत विशेष वावर असतो. त्यामुळे नागरिकांनी चोरांना लुटमार करण्याची संधी मिळणार नाही अशा प्रकारेच राहिले पाहिजे. लूट करणारे त्यांना हवे असते ते मिळवण्यासाठी शारीरिक इजा करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. असे असल्याने संकट ओढवून घेण्यासारखी कृती होणार नाही याकडे लक्ष देऊन सतर्क राहूया.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)