दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा पारा वाढला; 10 मतदारसंघात 63 टक्के मतदान

2014चा विक्रम मोडला

मुंबई – रखरखत्या उन्हांमध्येही मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा 2014च्या लोकसभेचा विक्रम मतदारांनी मोडून काढला. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झाले. मात्र, उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असल्याने हे मतदान 63 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा 10 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी केंद्रिय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, डॉ. प्रीतम मुंडे आदी दिग्गजांसह 179 उमेदवारांचे राजकिय भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले.

2014च्या लोकसभा निवडणूकीत याच मतदारसंघात 62.60 टक्के मतदान झाले होते. पण आज सकाळपासून तापमानाचा पारा वाढला असला तरी रखरखत्या उन्हात मतदानाचा पारा मात्र जराही कमी झालेला नाही. अनेक मतदानकेंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरु असल्यामुळे मतदानाची टक्केवारी 63 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज दिलीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे. परभणी येथे मतदान केंद्राबाहेर पोलिसांच्या गाडीवर दगडफेकीची घटना वगळता सर्व दहा मतदारसंघातील मतदानकेंद्रावर शांततेत मतदान झाले.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत बुलढाणा 57.09 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के, अकोला 54.45 टक्के आणि सोलापूरमध्ये 51.98 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी शिंदे यांनी दिली.

ठळक वैशिष्ट्‌ये…
– 2129 मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपण केले
– 1641 मतदान केंद्राचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
– 87 मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचाऱ्यांनीच मतदानाची प्रक्रिया पार पाडली
– राज्यभरात 30 पेड न्यूजचे प्रकरण उघडकीस. यापैकी 24 प्रकरणांमध्ये तथ्य आढळले असून त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)