मुंबई (प्रतिनिधी) – आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला मदत करण्याबाबत आम्ही सरकार तसेच आरबीआय बॅंकेला कोणतेही आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.
काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने कर्ज पुरवठादारांकडून आणीबाणीसाठी 400 कोटी मागितले आहेत. मात्र, ते पैसे देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजने आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या जेटला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार तसेच आरबीआय बॅंकेला आर्थिक मदत करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी करत ऍड. मॅथु निदुंपरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.