पाटण – शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथे सोमवारी घडली. दादासो बापूराव सुर्यवंशी (वय 39) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी दादासो सूर्यवंशी हे रोपे नावाच्या शिवारातील शेतात गेले होते ते घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे सायंकाळी वडील बापूराव सूर्यवंशी व भाऊ आदिक यांनी त्यांचा शोध घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास दादासो यांचा मृतदेह शिवारातील विहिरीजवळ आढळून आला. विहिरीवरील वीज मीटरच्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. सोमवारी दिवसभर विभागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन विजेचा धक्का बसला असल्याची शक्यता नातेवाईक व
ग्रामस्थांनी व्यक्त केली. घटनास्थळी पाटण पोलिसांनी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे.