रिक्षांची तोडफोड

पुणे – कात्रज परिसरात सहासिटर रिक्षा थांब्यावर रिक्षांची तोडफोड करण्यात आली. हातात कोयते व इतर हत्यारे घेत रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. भर दुपारी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली होती. या घटनेत एकजण जखमी झाला आहे.

गणेश घावणे (वय 19, रा. अप्पर बिबवेवाडी) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अमर तांदळे (रा. वडगाव बुद्रुक) यास ताब्यात घेतले आहे. त्याच्या तीन साथीदारांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. चिवडशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश घावणे आणि अमर तांदळे हे दोघे रिक्षाचालक असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

कात्रज चौकातील आयसीआयसीआय बॅंकेसमोरील रस्त्यावर शुक्रवारी दुपारी सहा आसनी रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी तांदळे याने गणेश यास “तुला आज बघून घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने दोन दुचाकीवरून तिघे जण हातात कोयते घेऊन कात्रज चौकात दाखल झाले. त्यांनी पाठलाग करून कोयत्याने गणेश घावणेवर वार केला. हातावर वार लागल्याने जखमी झालेल्या गणेश घावणे यांनी जखमी अवस्थेत कात्रज चौकीत धाव घेतली. दरम्यान, आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या सात रिक्षांच्या काचा कोयत्याने फोडून नुकसान केले आणि तेथून पसार झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)