निगडी येथील प्रकार : विनयभंगाचाही गुन्हा दाखल
पिंपरी – पतीसह मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या भाजप नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच चापट मारुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार (दि. 12) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती
चौकात घडली.
याप्रकरणी संबंधित नगरसेविकेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन फॉर्च्युनर गाडीचा (एमएच-14/जीएस/909) चालक आणि अशोक काळे (वय 57, रा. चिंचवड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका आणि त्यांचे पती आपल्या मुलीला भेटण्यासाठी निगडी येथे गेले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते भक्तीशक्ती चौक येथून जात असताना आरोपींनी त्यांची फॉर्च्युनर गाडी संबंधित नगरसेविकेच्या मोटारीसमोर आडवी लावली. त्यानंतर मोटारचालकाने नगरसेविकेला गाडीतून उतरायला लावले व अश्लील वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला.
तसेच “ऐ तुने मेरे मालिक के खिलाफ पोलीसमें क्यों तक्रार किया’ असे म्हणून नगरसेविकेला चापट मारली. मोटारीत बसलेल्या आरोपी काळे याने “गाडी डाल उसके ऊपर’ असे म्हणत अश्लील हातवारे करीत विनयभंग केला. त्यानंतर आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील गाडी नगरसेविकेच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत नगरसेविकेने फिर्याद दिली असून उपनिरीक्षक एस. एस. घाडगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.