-डॉ. मेघश्री दळवी
माणूस टोळ्या करून राहायचा तेव्हा आपल्या परिसरापलीकडे त्याला काहीच माहिती नसायची. हळूहळू तो प्रवास करायला लागला, अधिकाधिक जमीन मिळवायला लागला, समुद्राच्या पल्याड काय असेल याच्या शोधात निघाला. जशी त्याने आपली वसती विस्तारत नेली, जशी त्याची माहिती वाढत गेली आणि त्याने मोठमोठ्या प्रदेशांना खंड (कॉन्टिनेन्ट) अशी नावं दिली. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप, आफ्रिका, मग ऑस्ट्रेलिया आणि शेवटी अंटार्क्टिका.
सात खंडाच्या या पृथ्वीला आता आठवा खंड मिळणार आहे? होय. माणसाची नजर आता पृथ्वीच्या पलीकडे जाते आहे. सूर्यमालेतले ग्रह आणि त्यांचे चंद्र त्याला आता खुणावत आहेत. मग आपला चंद्र कसा मागे राहील? चंद्रावर वस्ती करायचा मनसुबा अमेरिका, भारत, चीन, जपान, इस्रायल या देशांनी बोलून दाखवलेला आहे. सोबत ब्ल्यू ओरिजिन, स्पेस-एक्स, शिमीझू या खाजगी कंपन्याही तिथे लहानमोठ्या वसाहती उभ्या करण्याचे बेत करत आहेत. आणि लवकरच चंद्र आपला आठवा खंड होईल अशी त्यांना आशा आहे.
चंद्रावर पृथ्वीच्या एकषष्ठांश गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे तिथे तळ उभारला तर तिथून यानं अवकाशात पाठवणे सोपे पडेल हा एक हेतू त्यामागे आहे. चंद्रावर भरपूर खनिजं उपलब्ध आहेत, ती खोदून काढून त्यांच्यावर तिथेच प्रक्रिया करणं सोपं पडेल. हेलियम मिळवणं हेही शक्य आहे. खाणकाम,धातूकाम, धातूंच्या वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, असे अनेक उद्योगधंदे चंद्रावर बहरतील अशी काही जणांची संकल्पना आहे. अवकाशयानांची बांधणीही चंद्रावर करणं सोयीचं होईल असा नासाचा अभ्यास दाखवतो आहे. आपल्या लोकसंख्येला पृथ्वीवरची जमीन अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे आफ्रिका खंडाइतकं क्षेत्रफळ असणाऱ्यास चंद्राच्या जमिनीचा मोह पडला नाही तर नवल!
तिथे शहरं उभारली तर उद्योगांच्या जोडीने पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. वस्तीसाठी लागणारी बरीचशी साधनसंपत्ती चंद्रावर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पाणी आणि ऑक्सिजन हे एखाद्या उद्योगातून बाय-प्रॉडक्ट म्हणून मिळवता येईल याचा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या विषयावर अनेक शोधनिबंध आहेत आणि सायन्स फिक्शनमध्येही या कल्पना वापरलेल्या दिसतात. पृथ्वी जवळ असल्याने प्रवास अगदी सहज करता येईल.
रेडियो संपर्कात फारसा वेळ जाणार नाही. चंद्रावर वेगळी इंटरनेट सेवा निर्माण करून ती पृथ्वीवरच्या इंटरनेटशी जोडता येईल. सहज उठून परदेशात जावं तशी माणसं चंद्रावर जा-ये करतील, हौसेने फिरायला येतील, तिथून आपली पृथ्वी कशी दिसते याचा अनुभव घेतील. एक षष्ठांश गुरुत्वाकर्षणात चालायची, उड्या मारायची गंमत करून पाहतील. म्हटलं तर अनेक अफाट कल्पना तिथे प्रत्यक्षात आणता येतील. येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये हे सगळं घडून येईल. आणि मग चंद्र केवळ कवीकल्पनेत किंवा पृथ्वीचा उपग्रह म्हणून उरणार नाही, तर खरोखरच तो आपला आठवा खंड होईल!