चार दिवसांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह : सासऱ्याविरुद्ध गुन्हा
पुणे – प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला सासऱ्याने दमदाटी केल्याने त्याने हडपसर भागात रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे काळेपडळ रेल्वे गेटजवळ घडली. कृष्णा उर्फ किसन प्रल्हाद मुंडलीक (रा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मुंडलिक याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून धोंडीराम साहेबराव शिंदे (45,रा. काळेपडळ, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंडलिक याची आई यमुनाबाई (60 ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडलिक हडपसर भागातील एका सराफी दुकानात कामाला होता. मुंडलिक आणि शिंदे यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. ती एका महाविद्यालयात शिक्षणही घेत आहे. दोघांनी दि.7 जुलै रोजी आळंदीत विवाह केला. त्यानंतर ते घरी आले.
दरम्यान, मुलीने मुंडलिक याच्याबरोबर प्रेमविवाह केल्याने शिंदे चिडले होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी मुंडलिक याला धमकावले होते. त्यानंतर मुंडलिक याने मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास काळेपडळ येथील रेल्वे फाटक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी मारली. धावत्या रेलेगाडी खाली तरुण मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतावस्थेत सापडलेल्या मुंडलिक याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांमुळे त्याची ओळख पटली. आत्महत्या करण्यापूर्वी मुंडलिक याने लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली. त्यात “प्रेमविवाह केल्याने सासरे धोंडिराम शिंदे यांनी धमकावल्यामुळे आत्महत्या करत आहे,’ असे त्यात लिहिले होते. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून सहायक पोलीस निरीक्षक खोपडे तपास करत आहेत.