नाराजीचा सूर : विधानसभेचा विचार सोडून देण्याचा स्पष्ट सल्ला
पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप आणि शिवसेनेत युती असणार आहे. तर युतीधर्मानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा, त्या-त्या पक्षाकडेच ठेवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याने पुण्यातून शिवसेनेच्या तिकिटीवर विधानसभा वारीच्या तयारीत असलेल्या अनेकांना इच्छांना मुरड घालावी लागणार आहे.
पुण्यातील आठही विधानसभेच्या जागांवर भाजपचे आमदार असल्याने विधानसभेचा विचार सोडून पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या सूचना शिवसेनेकडून प्रत्येक विधानसभा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, त्याच वेळी शिवसेनेकडून शहरातील अस्तित्त्व टिकविण्यासाठी हडपसर आणि खडकवासला विधानसभेची मागणी करण्यात येणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छूकांसाठी “थोडी खुशी आणि जादा गम’ अशी स्थिती आहे.
2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे शिवाजीनगर, कोथरूड तसेच हडपसर विधानसभा मतदरसंघ होते. हे तीनही शिवसेनेचे बालेकिल्ले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत या तिन्ही बालेकिल्ल्यांना भाजपनेच सुरूंग लागले. या निवडणुका शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्याने शिवसेनेला दारूण पराभव पत्करावा लागला. तर या निवडणुकीत आठही विधानसभा भाजपच्या खात्यात जमा झाल्या. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून शहरातील पक्षाची संघटना मोडकळीस आली असून त्यासाठी पक्षाकडून वेळोवेळी “डॅमेज कंट्रोल’ही करण्यात येत आहे.
मात्र, पक्ष संघटना आणखी खालावत असल्याने विधानसभेनंतर शहर प्रमुखपदाची जबाबदारी कॉंग्रेसमधून पुन्हा घरवापसी केलेले माजी आमदार विनायक निम्हण यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन शहर प्रमुख नेमून पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत फारसा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे निवडणुकीत पक्षाला 162 मधील केवळ 10 जागांवर विजय मिळविता आला. त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रितच लढणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेने 2017 मध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी शहर प्रमुखांची दोन पदे निर्माण केली. त्याची जबाबदारी कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडे देण्यात आली. आता मागील आठवड्यात शहरप्रमुख हे पदच रद्द केले आहे. तर आठ विधानसभांसाठी स्वतंत्र प्रमुख नेमले आहेत. हे सर्व प्रमुख दावेदार समजले जात होते. त्यातील काहींकडून कामालाही सुरूवात करण्यात आली होती. मात्र, युतीमुळे या सर्वांची विधानसभेची वारी यंदा हुकणार आहे.
हडपसर, खडकवासला मागितल्याची चर्चा
शहरात आठही आमदार भाजपचे असले तरी, शिवसेनेकडून शहरात हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांना काहीसा दिलासा मिळत आहे. शहरातील आठही मतदारसंघ भाजपला गेल्यास शहर शिवसेनेला संघटनात्मक बांधणीत अडचणीत येणार असल्याने या दोन मतदारसंघाची मागणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत हडपसर-शिरूरमध्ये तर खडकवासला-बारामती लोकसभेत येतो. त्यात हडपसरमध्ये शिवसेनेला आघाडी असून खडकवासलातही भाजप उमेदवारासाठी शिवसेनेने चांगली मदत केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची मागणी केली जात आहे. हडपसरमधून विद्यमान नगरसेवक नाना भानगिरे, माजी आमदार महादेव बाबर, तर नवीन विधानसभा प्रमुख तानाजी लोणकर हे जागा मिळाल्यास उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, नीलेश गिरमे, माजी नगरसेविका कल्पना थोरवे, नितीन वाघ यांनी तयारी सुरू केलेली आहे.
संघटन वाढविण्याचा सल्ला
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची संपर्क प्रमुख बाळा कदम यांनी शिवसेना भवन येथे बैठक घेतली. यात या आठही ऊपदाधिकाऱ्यांना “विधानसभेचा विचार सोडून द्यावा’ अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. “युती निश्चित असून कोणत्या जागा कोणाला द्यायच्या याबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष न देता शहरात संघटन वाढविण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, पक्षाची बांधणी करण्यासाठी संपर्क मोहिमा तसेच वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत,’ अशा सूचना कदम यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.