शिवसेनेचा झेंडा निवडणुकीपुरता भाड्याने देणे आहे…

नेत्यांकडून आयात उमेदवारांनाच प्राधान्य
अनेकांचे प्रयत्न “मातोश्री’ कनेक्‍शनसाठी!

सातारा – विद्यमान जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ नेते पार्टे गुरुजी व नरेंद्र पाटील आघाडीवर होते. सातारा येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकास सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणीही झाली; पण ऐनवेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवार करून निवडणूक काळापुरता शिवसेनेचा झेंडा त्यांच्या खांद्यावर दिला. तरीही शिवसैनिकांनी अल्प कालावधीत जोमाने काम करून चार लाख मते मिळवली. पण निवडणुकीनंतर नरेंद्र पाटील शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमाला दिसले नाहीत.

अपवाद मुंबईत झालेला शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा. यावरून असेच दिसते की, इतर पक्षातील नेते निवडणूक लढवण्यासाठी सेनेचा वापर करतात आणि निवडणूक संपल्या की पक्षाला फाट्यावर मारतात. यापूर्वी पुरूषोत्तम जाधव यांच्याबाबतीतही हाच प्रयोग केला; पण तोही फसलेला होता. यामुळे पक्षबांधणीला खो बसतो हे ना जिल्ह्याच्या पालकमंञ्याला कळते, ना रहिमतपूरवरून जिल्ह्याचा रथ हाकणारा उपनेत्याला!म्हणून तर जिल्ह्याच्या राजकारणात तिसऱ्या स्थानी असलेली शिवसेना चौथ्या स्थानी पोहचली हे आजचे कटू सत्य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीत भाजपला अवाढव्य बहुमत मिळाले. या निकालानंतर भाजपकडे इनकमिंगला जोर चढला आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात युती म्हणून लढवणार असल्यामुळे साहजिकच काही नेते शिवसेना प्रवेशासाठी इच्छुक आहेत. कारण जिल्ह्यात किमान पाच मतदारसंघ हे सेनेच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची मांदियाळी आतापासून “मातोश्री” कनेक्‍शन शोधत आहे.

जिल्ह्याचा विचार करता पाटण, कराड उत्तर, कोरेगांव, फलटण व वाई हे मतदारसंघ सेनेकडे राहतील. पाटण मतदारसंघात सेनेकडून विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनाच उमेदवारी मिळेल. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सध्यातरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे. तिथे सेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील कामाला लागले आहेत. तसे पाहिले तर बानुगडेंची जन्मभूमी व कर्मभूमी याच मतदारसंघात येते. कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांनी हणबरवाडी- धनगरवाडी योजनेसाठी विशेष प्रयत्न करून निधीही आणला पण हे करत असताना तालुक्‍यात सेनेचे इतर स्थानिक नेतृत्व त्यांनी मुद्दामहून वाढू दिले नाही. कारण ते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, अशी चर्चा खासगीत आहे. पण सध्यातरी या मतदारसंघात सेना फक्त इतर पक्षातील नेंत्यावर जाळे फेकण्यात मश्‍गुल आहे.

यात अनुक्रमे धैर्यशील कदम (कॉंग्रेस), श्री.मनोज घोरपडे(भाजप) व सुनील माने (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. काल-परवा झालेले कराड तालुक्‍यातील पक्षप्रवेश ही त्याची सुरूवात आहे. पण यात खरी शोकांतिका झाली आहे ती निष्ठावंताची! कारण सत्तेवर नसताना रस्त्यावर उतरून लढणारा शिवसैनिक आता अडगळीत जातोय, अशी भीती त्याला सतावत आहे.

कोरेगांव तालुक्‍यात यावेळी हाय-व्होलटेज लढाई होणार असे दिसत आहे. कारण मतदारसंघात विद्यमान आमदारांच्यावर खूप नाराजी आहे, असे बोलले जात आहे. एकास- एक उमेदवार दिल्यास कोरेगांवमधून धक्कादायक निकाल लागेल, असे म्हटले जाते. पण युतीकडून उमेदवार कोण, हाच प्रश्‍न तालुक्‍यातील जनतेच्या ओठी आहे. गेली कीाह वर्षे विद्यमान आमदारांच्या विरोधात आघाडी उघडणारे भाजप नेते महेश शिंदे यांच्यासाठी आता खरा कसोटीचा काळ आहे. कारण युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला भेटणार आहे.

जिल्ह्यात फक्त कोरेगांव मतदारसंघात निष्ठावंत पदाधिकारी निवडणूक लढवण्याची ताकद राखून आहेत. पण संपर्कप्रमुख व उपनेते आपली ताकद निष्ठावंताना देणार का परत एकदा भाजपतून आयात उमेदवार लादणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. पण जिल्ह्याचा कारभार पाहणारे उपनेतेच महेश शिंदेच्या प्रवेशासाठी खास आग्रही आहेत. कारण सेना पदाधिकाऱ्यांची भेट टाळणाऱ्या उपनेत्यांनीच मागील पंधरावड्यात महेश शिंदे यांना मातोश्रीची सहल घडवून आणली आहे.

फलटण तालुक्‍याचे राजकारण गेली काही वर्षे रामराजे व हिंदुराव या दोन नाईक- निंबाळकरांच्या भोवती फिरत आहे. मधल्या काळात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून दिगंबर आगवणे यांनीही आपली ताकद फलटण तालुक्‍यात दाखवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सेना प्रवेशाची तीव्र इच्छा बाळगून असणारे आगवणे माढा लोकसभा निकालानंतर थोडेसे बॅंकफुट आलेले आहेत.पण ते निवडणूक लढवणार हे मात्र निश्‍चित आहे. तसेच रिपब्लिकनचे युवा जिल्हाध्यक्ष व वाठार स्टेशनचे अमोल आवळे यांनीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पक्षप्रवेश केला आहे.वाई मतदारसंघात पक्ष म्हणून राष्ट्रवादीची बांधणी निश्‍चितच मजबूत आहे. मकरंद पाटलांनी खासदारपुत्र हा टॅंग आपल्या नावापासून कधीच पुसला आहे. सर्वसामान्य लोकात मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत आहे.

पण मोदी लाटेत जसे अनेकांचे बाल्लेकिल्ले उद्‌ध्वस्त झाले, त्याचप्रमाणे याही मतदारसंघातील युतीचे नेते आस राखून आहेत. मागील काही वर्षे फक्त किसन वीर कारखाना हेच कार्यक्षेत्र म्हणून काम करणारे माजी आमदार मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने युतीत चैतन्याचे वारे आहे. पण पुरूषोत्तम जाधव यांच्यासारखे नेते परत स्वगृही परतल्यापासून येथेही शिवसेनेला एक हक्काचा उमेदवार मिळाला आहे. ज्या मतदारसंघातील जन्मभूमी असणारे एकनाथ शिंदे, गजानन बाबर, दगडू सपकाळ यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक जिल्ह्याबाहेर जाऊन मंत्री,खासदार व आमदार झाले. त्या मतदरसंघात सेनेला उमेदवारीसाठी उपऱ्यांची मदत घ्यावी लागते, हेही तितकेच खरे आहे. सध्यातरी बाहेरून उमेदवार लादण्याचे प्रयत्न जिल्हा नेतृत्वाने सुरू ठेवला आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षातील निष्ठावंताना ताकद दिली असती तर ऐन निवडणूक काळात उपऱ्याची गरजच पडली नसती, या चर्चेने आता जोर धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)