जीवनयोगी साने गुरूजी

बलसागर भारत होवो, विश्‍वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो.

हे गीत लिहून राष्ट्रभक्तीची ज्योत अगणित तरूणांच्या मनामध्ये पेटविणारे थोर स्वातंत्र्यसैनिक म्हणजे पांडुरंग सदाशिव साने ज्यांना संपूर्ण देश साने गुरूजी या नावाने ओळखतो. साने गुरूजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड (रत्नागिरी) येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावाकडे पूर्ण केले आणि नंतर इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम. ए. पूर्ण केले.

श्‍यामची आई या आत्मकथनपर पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. यावर श्‍यामची आई नावाच्या चित्रपटाची निर्मितीही झाली आहे. आपल्या मुलाचे जीवन उन्नत करण्यासाठी आईची अंत:शक्ती या पुस्तकातून आपल्याला पहावयास मिळते. त्यांच्या आईने त्यांना जे संस्कार दिले त्यावरच गुरूजींच्या जीवनाचा पाया अवलंबून आहे, हे आपल्याला त्यांच्या साहित्यातून समजते. साने गुरूजींवर महात्मा गांधीजींचा विशेष प्रभाव होता. स्वच्छता, खादी विकणे, साक्षरतेचे वर्ग चालविणे, हुतात्म्यांच्या परिवाराला सहाय्य करणे तसेच जाती निर्मुलनासाठी त्यांनी सातत्यपूर्ण काम केले. वेगवेगळ्या भूमिका निभवत असताना त्यांनी कायम समाज आणि देश आपल्या केंद्रस्थानी ठेवला होता. कधी ब्रिटीश सरकारच्या विरोधात भाषण केले म्हणून तर कधी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. 1946 मध्ये पंढरपुरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्‍यांसाठी खुले व्हावे यासाठी त्यांनी उपोषण केले होते. ज्यामुळे समाजातील सर्व घटकांना मंदिरात प्रवेश मिळाला.

आंतरभारती नावाच्या चळवळीच्या माध्यमातून भारताला जोडण्यासाठी गुरूजींनी प्रयत्न केले. याचा उद्देश विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, लोकसाहित्य, नृत्ये यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधली जावी हा होता. समतेची प्रस्थापना व्हावी या उद्देशाने त्यांनी पुणे येथे साधना या साप्ताहिकाची सुरूवात केली. जे आजही समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून कार्यरत आहे. तसेच साने गुरूजींनी राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही केली होती. ज्याच्या मदतीने असंख्य समाजवादी विचारांनी प्रेरित कार्यकर्त्यांचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. समकालीन स्थितीमध्ये धर्माच्या नावावरून खूप मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. मात्र, अशा स्थितीमध्ये साने गुरूजी यांनी खऱ्या धर्माची व्याख्या आपल्या एका गीतामधून अत्यंत स्पष्टपणे सांगितली आहे. ते गीत म्हणजे,
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे.

लोकशाही समाजवादाचे भाष्यकार, महान स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक साने गुरूजी या महामानवास त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)