मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून भाजपच्या महाराष्ट्रातील कोअर कमिटीची नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल रणनीतीबाबत चर्चा झाली होती. बैठकीदरम्यान अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले की, ‘शिवसेनेसोबतची युती विधानसभेसाठी कायम राहिल परंतू मुख्यमंत्री मात्र भाजपचाच हवा.’ तर दुसरीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करणार म्हणजे करणार, जे आव्हान देतील त्यांच्या छाताडावर वसून त्यांचे आव्हान तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही’, अशी गर्जना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबुक पोस्टद्वारे भाजप आणि शिवसेनेवर चांगलाच टोला लगावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबुक पोस्टद्वारे व्यगंचित्र शेअर केले आहे. या व्यगंचित्रात अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आहे. तसेच या पोस्टला शिवसेना आणि भाजपला निशाणा साधत ‘सत्तेसाठी लाचार.. आणि आता मुख्यमंत्रीपदासाठीही?’ असे कॅप्शनही देण्यात आले आहे. या व्यंगचित्रातून शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी आणि आता मुख्यमंत्रीपदासाठीही लाचार आहे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसने लगावला आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ते ठरवेल. दरम्यान, आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवापासून अधिकच सक्रिय झालेले दिसत आहेत.