जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे पावसाची संततधार सुरूच

कोयना धरणात चार टीएमसीने वाढ
सातारा/पाटण  –
दोन दिवस दमदार पावसाने दमदार बॅटींग केल्यानंतर सोमवारी जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. सातारा, वाई, महाबळेश्‍वर, कराड आणि पाटण तालुक्‍यात संततधार पाऊस सुरू होता. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे धरणामध्ये चार टीएमसीने वाढ होऊन पाणीसाठा 28.97 टीएमसीपर्यंत पोहचला.

दरम्यान, सोमवारी जिल्ह्याच्या पश्‍चिमेच्या तालुक्‍यांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. मात्र, पूर्वेच्या कोरेगाव तालुक्‍यात अपेक्षित पावसाला अद्याप सुरूवात होताना दिसून येत नाही तर उर्वरित दुष्काळी तालुक्‍यांमध्ये परिस्थिती कायम आहे. अशा स्थितीत कोयना व कण्हेर धरणामध्ये मागील आठवड्यापासून पाणीसाठ्यात अपेक्षेप्रमाणे वाढ होताना दिसून येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली होती. खरिपाच्या पेरणीसाठी उपयुक्‍त ठरणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावली यामुळे पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी सध्या आनंदात आहेत. खरीप पेरणी केलेल्या पिकांच्या मशागतीसाठी पावसाने विश्रांती घेणे आवश्‍यक आसल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. खरीपात पेरणी केलेल्या पिकांच्या मशागतीसाठी घात मिळणे गरजेचे आहे. तालुक्‍यात सोयाबिन, हायब्रिड, नाचणी, भुईमूग, भात या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

कराड तालुक्‍यात 2921 मिलिमीटर

कराड तालुक्‍यात मागील आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला असून या पावसाने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत. काही भागात संततधार तर काही भागात दोन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. रविवारअखेर कराड तालुक्‍यात 2921 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस उंडाळे मंडलामध्ये तर सर्वात कमी पाऊस इंदोली मंडलात नोंद झाला आहे. त्याचबरोबर कोपर्डे हवेली परिसरातील नडशी, शिरवडे, उत्तर कोपर्डे परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकून घेतल्याने सलग दोन दिवस आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चार ते पाच फूट वाढ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)