गावांचा बदलता चेहरा : पुनावळेचे बदलले बाह्यरूप

पुनावळे - येथील अंतर्गत रस्त्याची झालेली दुरवस्था.

विविध समस्यांची जंत्री; वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम

पिंपरी  – पुनावळे गाव हे बाह्यरूपाने बदलले आहे. डांबरी रस्ते झाले. वीज, पाणीपुरवठा यांची सोय झाली. भव्य गृहप्रकल्प साकारत आहेत. मात्र, गावात फेरफटका मारल्यानंतर विविध समस्यांची जंत्री समोर येते. गावात लोकवस्ती वाढली आहे.

रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी होत नाही. पर्यायाने, नागरिकांची गैरसोय होत आहे. पुनावळे गावठाण ते जांबे दरम्यान असलेल्या रस्त्यावर मुंबई-बंगळुरू महामार्गाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या (सब-वे) येथे सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बाब झाली आहे.

पुनावळे गावाची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार इतकी आहे. गावामध्ये माळवाडी, ताजणे वस्ती, पांढरे वस्ती, काटे वस्ती, गायकवाड वस्ती, ढवळे वस्ती, कोयते वस्ती, विजयनगर, बुरगे वस्ती, पुनावळे गावठाण आदी भागाचा समावेश आहे.

गावामध्ये फिरताना अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहण्यास मिळते. गावामध्ये महापालिकेची सातवीपर्यंत शाळा आहे. दहावीपर्यंत शाळा सुरू करण्याची गरज आहे. गावामध्ये महापालिकेचा दवाखाना आहे. तेथे बाह्यरुग्ण विभागाची सुविधा आहे. आंतररूग्ण विभाग नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

“गावामध्ये बरेच प्रश्‍न प्रलंबित आहेत. बुद्ध विहाराची दुरवस्था झाली आहे. नदी घाट होणे आवश्‍यक आहे. रावेत बंधारा शंभर वर्षे जुना आहे. त्याचे काम व्हायला हवे. गावात कोठेच पदपथ नाहीत. उद्यानाच्या कामाचे भुमीपूजन झाले. प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. नवीन स्मशानभूमीचे काम होणे गरजेचे आहे. विकास आराखड्यातील 3 ते 4 रस्ते झाले. नव्याने काही कामे झालेले नाही.
– शेखर ओव्हाळ, माजी नगरसेवक

आरक्षणांची 3.38 हेक्‍टर जागा ताब्यात

पुनावळे गावात विकासकामांसाठी 34 आरक्षणे पालिकेकडून टाकण्यात आली आहेत. 43.86 हेक्‍टरपैकी 3.38 हेक्‍टर इतकी जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामध्ये 5 आरक्षणे अंशत: तर, 2 आरक्षणांच्या जागा पुर्णत: ताब्यात आल्या आहेत. प्राथमिक शाळा, उद्यान, मैलाशुद्धीकरण केंद्र, दवाखाना व प्रसुतिगृह, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे, बसथांबा, शॉपिंग सेंटर, रिटेल मार्केट, घनकचरा व्यवस्थापन आदींसाठी विविध आरक्षणे आहेत.

“गावामध्ये होणारी पाणी गळती रोखावी. अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण रखडले आहे. पुनावळे गावठाण ते जांबे दरम्यान असलेल्या रस्त्यावर मुंबई-बंगळुरू महामार्गाखालून जाणाऱ्या “सब-वे’ ची उंची वाढवावी किंवा पुनावळे गावठाण ते काटे वस्तीदरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल करावा, यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे. पोलीस चौकी, अग्निशामक केंद्र यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. विकास आराखड्यातील 4 रस्त्यांचे काम सुरू आहे. माळवाडी येथे पाचवीच्या वर्गासाठी प्रस्ताव दिला आहे.
– रेखाताई दर्शले, नगरसेविका

-काय हव्यात सुविधा

-अंतर्गत रस्त्यांची तातडीने व्हावी दुरूस्ती
-विकास आराखड्यातील नियोजित रस्त्यांचा विकास गरजेचा
-मुलांसाठी हवी खेळाच्या मैदानाची सोय
-उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हवे विरंगुळा केंद्र
-सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे गरजेचे
-पदपथ, स्मशानभूमीचे काम होणे आवश्‍यक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)