#IPL2019 : जेतेपदाचा चौकार कोण लगाविणार.? मुंबई-चेन्नईत आज महायुध्द

हैद्राबादमध्ये आज होणार अंतिम सामना : मुंबईचे पारडे जड

हैद्राबाद – आयपीएलच्या 12व्या सत्रातील अंतिम सामन्यासाठी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम सज्ज झाले आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला पराभूत करत आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या दोन्ही संघांना विजयी चौकार मारण्याची संधी आहे. आतापर्यत दोन्ही संघांनी तीन-तीनवेळा जेतेपदावर नाव कोरले असून मुंबई पाचव्यांदा अंतिम फेरित दाखल होत आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा मुंबई आणि चेन्नईमध्ये जेतेपदासाठी सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे.

आतापर्यत मुंबई आणि चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्याच्या लढतीत मुंबईने दोनदा, तर चेन्नई एकदा यशस्वी झाली आहे. तसेच यंदाच्या सत्रात चेन्नईला मुंबईविरुद्ध एकही विजय नोंदविता आलेला नाही. मुंबईने दोन्ही लिग सामन्यासह पहिल्या क्‍वालिफायरमध्ये विजय मिळविलेला आहे.

मुंबईने चेन्नईविरुद्ध 2010मध्ये खेळलेल्या अंतिम सामना गमाविला होता. तेव्हा संघाची धुरा सचिन तेंडुलकर याच्याकडे होती. त्यानंतर मुंबईने 2013 आणि 2015मध्ये चेन्नईला पराभूत केले. या दोन्ही विजयावेळी रोहित शर्माच्या हाती मुंबईची सुत्रे होती.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात खूप समानता आहे. यातील सर्वात मोठी समानता म्हणजे शांत स्वभाव आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. या दोन्ही खेळाडूंना मैदानावर जास्त राग येत नाही. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही कर्णधार आपापल्या संघात कमी बदल करतात. यावरून त्यांच्या खेळाडूंवरील आत्मविश्‍वास दिसून येतो. धोनी हा रणनिती आखण्यात माहिर आहे, तर रोहितकडे मेंटॉर सचिन तेंडूलकर आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने या दिग्गजांचा पाठिंबा आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्‍विंटन डि कॉक ही जोडी यंदाच्या सत्रातील यशस्वी सलामीची जोडी ठरलेली आहे. तर मधळया फळीत सुर्यकुमार यादव याने अनेकवेळा संघाचा डाव सावरला आहे. तसेच यंदाच्या सीजनमध्ये अखेरच्या षटकांमध्ये जलद धावा काढण्यात मुंबईचा संघ यशस्वी ठरला आहे. यात हार्दिक पांड्याचे सर्वाधिक योगदान आहे. हार्दिकला कायरान पोलार्डनेचीही चांगली साथ मिळत आहे.

मुंबईच्या गोलंदाजांनीही आपली कामगिरी उत्कृष्टरित्या बजावली आहे. त्यांनी डेथ ओव्हरमध्ये विरोधी संघाला रोखण्यात यश मिळविले आहे. यात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा ही जोडी चेन्नईसाठी अडचणीची ठरू शकते.
दुसरीकडे, चेन्नईकडे एकापेक्षा एक सरस असे फलंदाज आहेत. शेन वॉटसन, सुरेश रैना, ब्रावो, अंबती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तर गोलंदाजीत दीपक चहर सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. त्याला शार्दुल ठाकूरने साथ दिल्यास सामना रंगतदार ठरेल. तसेच अनुभवी हरभजन सिंगने फिरकी गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. इमरान ताहिरही चांगल्या फॉर्मात असून त्याने 24 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये दोन्ही संघाचे प्रदर्शन

वर्ष     – चेन्नई सुपर किंग्ज – मुंबई इंडियन्स
2008 – उपविजेता – लीग स्टेज
2009 – सेमीफाइनल – लीग स्टेज
2010 – विजेता – उपविजेता
2011 – विजेता – प्लेऑफ
2012 – उपविजेता – प्लेऑफ
2013 – उपविजेता – विजेता
2014 – प्लेऑफ – प्लेऑफ
2015 – उपविजेता – विजेता
2016 – खेळले नाही (सस्पेंड) – लीग स्टेज
2017  – खेळले नाही (सस्पेंड) – विजेता
2018 – विजेता – लीग स्टेज

संभाव्य संघ :

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

Leave A Reply

Your email address will not be published.