सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार – गिरीश बापट

नागरिकांचा त्रास कमी करण्याचे प्रयत्न

पुणे – शहर आणि परिसराचा वेगाने होणारा विकास पाहता भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 66 हजार कोटी रुपयांचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता होईल, नागरिकांचा वेळ वाचेल, इंधनाचा अपव्यय होणार नाही, मानसिक त्रास कमी होईल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किफायतशीर व सुरक्षित होईल, असा विश्‍वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

औंध-खडकी-बोपोडी परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, परशुराम वाडेकर आदी सहभागी झाले होते.

मेट्रो, रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, ग्रेड सेप्रेटर,बीआरटीचे सक्षमीकरण, रिंग रोड, एचसीएमटीआर, पीएमपीचे सक्षमीकरण, एक हजार बसेसची खरेदी, विमानतळांना जोडणारे मार्ग आदी प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा आराखडा करण्यात आला आल्याचे बापट यांनी सांगितले.

रिपाइंचाही प्रचार
बापट यांचे मताधिक्‍य वाढवण्यासाठी रिपाइंचे कार्यकर्ते प्रचार करत असून, मागासवर्गीय आणि दलितांच्या योजनांची अंमलबजावणी या सरकारने केल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याची माहिती डॉ. अशोक कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बापट यांच्या प्रचारार्थ पुणे शहरात 20 कोपरा सभा घेण्यात येणार असून दीड लाख घरांपर्यंत संपर्क केला आहे. पुढील दोन दिवसांत दोन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले.

काश्‍मिरी पंडितांचा महायुतीला पाठिंबा
जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती येथील भाजपच्या उमेदवारांना शहरात राहणाऱ्या काश्‍मिरी पंडितांनी पाठिंबा जाहीर केला. तसे पत्र पंडितांचे प्रतिनिधी आशुतोस राझदान यांनी बापट यांना दिले. घटनेतील 370 आणि 35-अ या कलमांबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने भाजपला पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)