लेखा परीक्षणातील आक्षेपांची चौकशी होणार

पिंपरी – महापालिकेच्या लेखापरीक्षणातील आक्षेपांवर न झालेल्या कार्यवाहीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. प्रलंबित असलेल्या 38 हजार 318 आक्षेप प्रकरणांच्या चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख राजीव रंजन यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत 1999 मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षांचे लेखापरिक्षण केले होते. लेखापरिक्षणातील आक्षेपाधीन रकमेबाबत काय कारवाई करणार याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. याबाबत भापकर यांनी आक्षेपाबाबत तक्रारी दिल्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे महापालिकेच्या लेखापरिक्षणातील 3010 कोटींच्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कायद्याप्रमाणे कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती.

लेखापरीक्षणातील आक्षेपाबाबत कार्यवाही न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, वसूलपात्र रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, याबाबत उच्च स्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी भापकर यांनी केली होती. त्यानुसार पीएमओ कार्यालयाने राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. तसेच याप्रकरणी दखल घेऊन उचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना राजीव रंजन यांनी सरकारला केल्या आहेत.

याबाबत मारूती भापकर म्हणाले की, लेखापरिक्षणातील आक्षेपाबाबत महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास दिरंगाई केली जात आहे. आयुक्तांनी केवळ नोटीसा काढणे, वेतनवाढ रोखणे एवढ्या किरकोळ कारवाया केल्या आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालू नये, दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
…………………………………….
निरस्त आक्षेप संख्या 85,125
प्रलंबित आक्षेप संख्या 38,318
एकुण आक्षेपाधीन रक्कम 4,341.180 कोटी
प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम 3,010 कोटी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)