मोदी ठरले भारतीय राजकारणातील सुपरमॅन

नवी दिल्ली -भाजपला सलग दुसऱ्यांदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठूून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकप्रकारे भारतीय राजकारणातील सुपरमॅन ठरले आहेत. विजयाला गवसणी घालणारा सुवर्णस्पर्श आपल्याला लाभलेला असल्याचेच मोदींनी जणू दाखवून दिले आहे.

एकेकाळचा चहावाला अशी स्वत:ची सामान्य व्यक्ती म्हणून ओळख सांगणाऱ्या मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून सुरू केलेला प्रवास थेट देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापर्यंत पोहचला. पंतप्रधान बनण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळ भुषवणारा नेता बनण्याचा मान त्यांनी मिळवला. पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून स्वतंत्र भारतातील सर्वांत शक्तिशाली नेत्यांपैकी एक म्हणून केला जात होता. त्या बिरूदाला आता आणखी आधार मिळेल.

केंद्रात फिर एक बार मोदी सरकार निश्‍चित झाल्याने एक मजबूत नेता अशी मोदींची प्रतिमा आणखी घट्ट होईल. एकेकाळी हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून मोदींकडे पाहिले जात होते. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलींमुळे त्यांच्या प्रतिमेवर वादग्रस्ततेची एक पार्श्‍वभूमीही चिकटली. मात्र, पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी सबका साथ, सबका विकास हा नारा दिला. आता सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनून त्यांनी स्वत:ची लोकप्रियता आणखी व्यापक बनल्याचेच सिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)