शीला दीक्षित, अजय माकन पराभूत; दिल्लीमध्ये भाजपला सहज विजय

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये भाजपने अगदी सहज विजय मिळवल्याचे चित्र आहे. दिल्लीतील सर्वच्या सर्व सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. या सर्व ठिकाणी भाजपचा विजय निश्‍चित मानला जात आहे. कॉंग्रेसच्यावतीने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यांच्याबरोबर ज्येष्ठे नेते अजय माकन यांनाही दिल्लीच्या निवडणुकीत महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र शीला दीक्षित आणि माकन या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

उत्तर पूर्व दिल्लीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार आणि दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी शीला दीक्षित यांच्याविरोधात तब्बल अडीच लाख मतांची विजयी आघाडी घेतली. शीला दीक्षित यांचा पराभव कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा नवीन उमेदवार गौतम गंभीरनेही या निवडणुकीत पूर्व दिल्ली मतदारसंघातून 2 लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळवले आहे. गंभीरने कॉंग्रेसच्या अरविंद सिंह लवली आणि आम आदमी पार्टीच्या अतिशी या दोघांचाही पराभव केला. आतिशी यांनी गौतम गंभीरविरोधात बदनामीकारक पत्रके वाटल्याचा आरोप केला होता. मात्र त्या आरोपांचा मतदानावर परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. याच प्रमाणे भाजपच्या रमेश बिधुरी यांनी “आप’च्या राघव चढ्ढा आणि कॉंग्रेसच्या विजयेंद्र सिंह या दोघांवर तब्बल 1 लाख 70 हजारांची विजयी आघाडी घेतली आहे.

चांदनी चौक मतदारसंघातून चारवेळेस खासदार राहिलेल्या भाजपच्या हर्षवर्धन यांना ही जागा अपल्याकडे कायम राखण्यात यश मिळण्याचे चित्र मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत स्पष्ट झाले.

उत्तर पश्‍चिम दिल्लीतून गायक हंसराज हंस यांनी “आप’च्या गगन सिंह यांच्यावर तब्बल 3 लाख मतांनी विजय मिळवला. हंस यांनी धर्मांतर केल्याने त्यांची राखीव मतदारसंघातील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी “आप’ने केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.