कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – आमची एक खासगी कंपनी आहे. या कंपनीमधील एका व्यवस्थापकाने कंपनीची रक्कम रु. 50,000/- चा घोटाळा केला होता व त्यासाठी आम्ही या व्यवस्थापकास बडतर्फ करून त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर या व्यवस्थापकास पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले असता त्यांनी हा गैरप्रकार करून ही रक्कम कंपनीस परत देण्याची तयारी दाखवली व त्यासाठी त्याने त्याच्या सख्ख्या भावास बोलावून या रकमेचा धनादेश भावाच्या खात्यातून आमचे कंपनीचे नावाने दिला. परंतु हा धनादेश आम्ही आमचे बॅंक खात्यामध्ये भरल्यानंतर तो पुरेशी शिल्लक नाहीत. या कारणास्तव नुकताच परत आला आहे. तरी याबाबत आता आम्ही पुढील काय कारवाई करावी?
उत्तर – आपण आपल्या प्रश्‍नामध्ये दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार पूर्णपणे मुद्दामून आपणास फसविण्याचा झाला आहे व त्यामध्ये आपले कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असून या व्यवस्थापकाला आर्थिक फायदा झाला आहे. तसेच या दोघांनी मिळून पोलीस खात्याची देखील फसवणूक केली आहे. तरी आपण याबाबत प्रथम आपण चेक देणाऱ्या व्यक्तींना परक्राम्य लेख अधिनियम 138 नुसार लेखी नोटीस वकिलामार्फत द्यावी. या अनादरित धनादेशाची मागणी करावी. या नोटिसीप्रमाणे या व्यक्तींनी आपणास रक्कम न दिल्यास आपण याबात परक्राम्य लेख अधिनियम (Nigotiable Instrument Act) प्रमाणे खासगी फिर्याद चेक देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दाखल करावी. तसेच या प्रकाराबाबत पोलिसांकडे इं.पि. कोड 34 व 420 नुसार फसवणुकीचा तक्रार अर्ज द्यावा म्हणजे त्याबाबत पोलीस दोन्ही व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई करतील. जर पोलिसांनी याबाबत दखल घेतली नाही तर आपण या दोन्ही व्यक्तींविरुद्ध वर दिलेल्या कलमाचे आधारे वेगळी खासगी फौजदारी फिर्याद देखील दाखल करू शकता. एवढी कारवाई करूनदेखील आपणास आपली रक्कम न मिळाल्यास या रकमेच्या वसुलीसाठी दिवाणी न्यायालयामध्ये वसुलीचा दावा करता भेटणे व त्यामध्ये या रकमेची मागणी व्याजासह व नुकसानभरपाईसह करू शकता.

प्रश्‍न क्र. 2 – मी पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी गेली अनेक वर्षे राहात आहे. मी राहात असलेली मिळकत ही खूप जुनी असून ही मिळकत सध्या आमचे हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीची व वहिवाटीची आहे. सदर मिळकतीचे अजून सरस निरस वाटप झालेले नाही. जुनी मिळकत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी आम्ही गेली 30 वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत; परंतु माझे व आमचे मिळकतीमधील इतर मालकांचे याबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने मला नाईलाजाने या जुन्या घरात राहावे लागत आहे. अजूनही या मिळकतीमधील देखभालीचा, दुरुस्तीचा खर्च मला करावा लागत आहे व पावसाळ्यामुळे येथे राहणे अधिक मुश्‍कील होत असते. याबाबत मी माझे नातेवाईक व इतर घरमालक यांचेबरोबर मला कुठलाही वाद, दावा करावयाचा नाही. मला फक्त या मिळकतीमधील मला मिळालेला अविभक्त हिस्सा तिऱ्हाईत इसमास विकत द्यावयाचा आहे. तर त्यासाठी मला कायद्यात तशी परवानगी आहे का? माझे भागाची ही मिळकत विक्री करताना मला इतर सह घरमालकांचे संमतीची आवश्‍यकता आहे का?
उत्तर – आपण विचारलेला प्रश्‍न हा मुख्यपणे हिंदू वारसा कायदाअंतर्गत आहे. एकत्र कुटुंबाचे बाबतीत जर मालकांमध्ये मतभेद असतील तर त्यासाठी न्यायालयात न जाता तुमचे तुम्ही कायदेशीररीत्या, भांडण तंटे न करता शांततेने सोडवण्याचा तुमचा विचारदेखील योग्य व कायदेशीर आहे. आजकाल वारसा हक्काने मिळालेल्या मिळकतीबाबत असलेले वारस सहजासहजी आपला मालकी हक्क सोडून देण्यास तयार होत नाहीत. काही बाबतीत काहीही मालकी हक्क/वहिवाट नसतानादेखील नोटीस देऊन, दावे करून व इतर मार्गाने मिळकतीमध्ये घुसण्याचा, राहण्याचा प्रयत्न करीत असतात. आपणास कायद्याने आपले मालकीस असलेल्या हिश्‍श्‍याची विक्री करण्याचा अधिकार आहे. परंतु, याअगोदर तुम्ही तुमचे इतर मालकांना भेटून, बोलून चर्चा करून तुमचा हिस्सा विक्रीबाबत बोलणी करावी व हा तुमचा अविभक्त हिस्सा जर कुणी इतर घरमालक त्यांची वाजवी किंमत देत असेल तर तसा व्यवहार करून टाकावा पण याबाबत इतर घरमालक तुमचा हिस्सा विकत घेण्यास तयार नसतील तर तुम्ही कायद्याने हा हिस्सा कुठल्याही तिऱ्हाईत इसमास विकू शकता व त्यासाठी तुम्हाला इतर घरमालक प्रतिबंध करू शकणार नाही.

शक्‍यतो तुम्ही तुमचा हिस्सा विकताना इतर घरमालकांची संमती घेणे कधीही रास्त व फायदेशीर राहील. तुम्ही तुमचे या मिळकतीमधील भागाचे खरेदी करणारा इसम हा तुमचे जागी येऊन त्याला या मिळकतीमधील तुमचे असलेले सर्व हक्क व अधिकार देखील मिळतील. त्यामुळे तुम्ही अविभक्त मिळकत विक्री करण्याचा घेतलेला निर्णय निश्‍चितपणे योग्य आहे. यासाठी तुम्हास खरेदीचा व्यवहार करण्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देऊन तुम्ही करत असलेल्या या मिळकतीचे व्यवहाराबाबत कुणाचीही कसल्याही प्रकारची हरकत आहे का हे बघणे योग्य ठरेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)