वाहतूक सिग्नलसाठी आता झेब्रा क्रॉसिंगवरच एलईडी रिफ्लेक्टर

हैदराबादच्या धर्तीवर पुण्यातही होणार चाचपणी : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुणे – हैदराबाद शहरातील केबीआर पार्क जंक्‍शन चौकात झेब्रा क्रॉसिंगवर रिफ्लेक्‍टर बसवून सिग्नल यंत्रणा हाताळण्यात येत आहे. एका आयटी कंपनीच्या सहाय्याने प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे वाहतूक शाखेने संबंधित आयटी कंपनीशी संपर्क साधला आहे. हा प्रयोग आपल्याकडेही शक्‍य आहे का? याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. हेल्मेटसक्ती, जगजागृती, नियम पाळणाऱ्यास गिफ्ट व्हाऊचर असे विविध प्रयोग राबवले जात आहेत. हैदराबादच्या केबीआर पार्क जंक्‍शन चौकामध्ये नुकताच डिजिटल पद्धतीच्या सिग्नल यंत्रणेचा प्रयोग सुरू आहे. चौकातील झेब्रा क्रॉसिंगवर रिफ्लेक्‍टरच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा हाताळण्यात येत आहे. याचा वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांना फायदा होत आहे. याचा प्रयोगही पुण्यात राबविण्याचा विचार पुणे पोलीस करत आहेत. सध्याच्या सिग्नलप्रमाणेच ठराविक सेकंदाने या रिफ्लेक्‍टरचा रंग बदलत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी याचा मोठा फायदा होतो. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने हैदराबाद पोलिसांमार्फत सिग्नल यंत्रणा बसवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आहे. पोलिसांच्या मागणीला प्रतिसाद देत कंपनीचे अधिकारी सोमवारी पुणे पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अशा प्रकारचा प्रयोग पुण्यात झाल्यास वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची आशाही पोलिसांनी बोलून दाखविली.

अशी यंत्रणा दिवसा कितपत शक्‍य?
सिग्नल यंत्रणेत असे बदल प्रथमच करण्यात येत असल्याचे सांगितले जात असून हैदराबादमध्येही प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रयोग सुरू आहे. याचा रात्री फायदा होत असला, तरी दिवसा कितपत वापर शक्‍य आहे याची तपासणी केली जाईल, अशी माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)