न्यूपोर्ट – भारताच्या लिएंडर पेसचे हॉल ऑफ फेम एटीपी टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत पेस व न्यूझीलंडचा मार्कोस डॅनियल यांना उपांत्य फेरीत बिगरमानांकित मार्सेल ग्रॅनोलर्स व सर्जी स्टाखोव्हस्की यांनी 3-6, 7-6 (10-8), 11-9 असे पराभूत केले.
एटीपी स्पर्धांच्या मालिकेत पेसने दुहेरीत आतापर्यंत 766 सामने जिंकले आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त सामने जिंकणारा तो जगातील सहावा खेळाडू आहे. या मोसमात त्याने एटीपी स्पर्धांमध्ये चार वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. जॉन मॅकेन्रोने 2006 मध्ये सॅन होजे येथील एटीपी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. त्यावेळी त्याचे वय 47 वर्षे होते. पेस याने येथे वयाच्या 46 व्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. त्याच्या या कामगिरीमुळे तो जागतिक क्रमवारीत 75 व्या स्थानावरून 72 व्या क्रमांकावर झेप घेईल.