लाहोर – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला आज पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी विभागाने अटक केली. तो आज गुजरानवाला येथून लाहोरला कोर्टाच्या सुनावणीसाठी जात असताना त्याला अटक करण्यात आली अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. त्याला अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. हाफीज सईद हा बंदी घालण्यात आलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचाही सूत्रधार आहे असे मानले जात आहे.
अमेरिकेने त्याला या आधीच जागतिक दहशतवादी घोषीत केले असून त्याच्या अटकेसाठी 10 लाख डॉलर्सचे बक्षिस अमेरिकेन सन 2012 साली घोषित केले आहे. त्याच्या अटकेसाठी पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सातत्याने दबाव येत असल्याने त्या दबावाखाली पाकिस्तानने त्याच्यावर ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.