राहुरी विद्यापीठ – राहुरी येथील अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी राहुरी नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत गांधीगिरी मार्गाचा अवलंब करून शहरातील कॉलेज रोड लगत झालेल्या गटारयुक्त जलतरण तलावाचे पुष्पहार अर्पण करून नारळ फोडत उद्घाटन केले.
राहुरी शहरात कॉलेज रोड येथील पाटील हॉस्पिटलसमोर राहुरी नगरपालिकेच्या कृपाशीर्वादाने पोपळघट इस्टेट या ठिकाणी सांडपाणी व पिण्याचा पाण्याचे पाइपलाइनच्या वालमधून गळती होऊन मोकळी असलेली जागा पाण्याने तुडुंब भरली आहे. संपूर्ण उन्हाळ्यात या पाइपमधून गळती होऊन पाणी वाया गेले आहे. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. संबंधित ठिकाणी परिसरातील सांडपाणी, पिण्याचा पाण्याचे पाइपलाइनच्या वालमधून गळती झालेले पाणी व आता पावसाचे येणारे पाणी साचून मोठे पाण्याचे तळे होणार आहे.
राहुरी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. वेळोवेळी नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या वरील बाब निदर्शनास आणून देखील समस्या न सुटल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी नगरपालिकेस आवाहन केले आहे की, आपण या जागेत जलतरण तलाव तरी करा असे म्हटले आहे. संबंधित डबक्याची हार नारळ वाहून पूजा करून प्रातिनिधिक स्वरूपात जलतरण तलावाचे पूजन करून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये असलेल्या या डबक्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रभागात काही सत्ताधारी गटातील नगरसेवक आहेत. मात्र ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी पालिकेचे कर्मचारी बोलावून जाब विचारला. मात्र त्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.