अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या; काळे

कोपरगाव – तालुक्‍यातील ब्राह्मणगाव, धारणगाव व कोपरगाव शहराच्या खडकी भागात शनिवारी (दि.22) झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करून मदत मिळवून द्यावी. तसेच खडकी भागात कोपरगाव नगरपरिषद व ब्राह्मणगाव, धारणगाव येथे पंचायत समितीने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी या ठिकाणी तातडीने जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहेत.

शनिवारी रात्री 10 वाजता झालेल्या मुसळधार पावसाने सलग अडीच ते तीन तास विजेच्या प्रचंड कडकडाटासह कोपरगाव तालुक्‍यातील ब्राह्मणगाव, धारणगाव व कोपरगाव शहराच्या खडकी भागात जोरदार हजेरी लावून संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका ब्राम्हणगावला बसला असून 80 टक्के नागरिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून जीवितहानी टळली असली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

सदरच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या घटनेची माहिती समजताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी सकाळीच ब्राम्हणगाव, धारणगाव व खडकी येथे जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून त्यांनी प्रत्येक कुटुंबाची समक्ष भेट घेवून त्यांना धीर देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने तातडीची मदत केली. तहसीलदार योगेश चंद्रे, कृषी अधिकारी आढाव व पशुवैद्यकीय अधिकारी दहे हेही त्यावेळी आशुतोष काळे यांच्या सोबत घटनास्थळी होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, गौतम बॅंकेचे व्हा. चेअरमन साहेबलाल शेख, धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी, तुकाराम उळेकर, रवींद्र पिंपरकर, गोटू जगताप, केशव कुऱ्हाडे, शिवनाथ कुऱ्हाडे, सोनवणे व आहेर कुटुंब, राजेंद्र जाधव तसेच नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार राजेंद्र वाकचौरे, हिरामण कहार, अजीज शेख व कार्यकर्त्यांनी नागरिकांना सहकार्य केले.

नालेसफाई न झाल्याने नाराजी कोपरगाव नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे खडकी भागातील नागरिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेने नाले सफाईचे काम हाती घेतले असते तर आज खडकीच्या नागरिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नसते, असा सूर लावण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)