सोक्षमोक्ष : स्पर्धा अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणाची

– प्रा. विजया पंडित

जगभरातील अण्वस्त्रांची संख्या घटल्याचे सांगितले जात असले तरी गेल्या वर्षभरात आण्विक युद्धाचा धोका खूपच वाढला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट या थिंक टॅंकने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जगातील 9 अण्वस्त्रसंपन्न देशांकडे 2019 मध्ये 13,865 इतकी अण्वस्त्रे होती. एका वर्षापूर्वीच अण्वस्त्रांची संख्या 14,465 इतकी होती. संख्येत घट दिसत असली, तरी अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. अण्वस्त्रांच्या जागतिक स्पर्धेत चीन आणि पाकिस्तानचा समावेश आहे, ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

गेल्या वर्षभरात जगातील अण्वस्त्रांच्या संख्येत एका वर्षापूर्वीच्या संख्येपेक्षा घट निश्‍चित झाली आहे. परंतु अण्वस्त्रसंपन्न देश आपल्याकडील अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणावर भर देऊन ती अधिक घातक बनवीत आहेत. शिवाय, चीन आणि पाकिस्तान हे असे देश आहेत, जे अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यांची संख्याही वाढवीत आहेत. स्टॉकहोम येथील आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) दिलेल्या ताज्या अहवालानुसार, 2019 च्या सुरुवातीला अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांकडे मिळून सुमारे 13 हजार 865 इतकी अण्वस्त्रे होती. 2018 च्या तुलनेत ही संख्या 600 ने घटली आहे. 2018 मध्ये अण्वस्त्रांची जगातील संख्या 14 हजार 465 एवढी होती. 13 हजार 865 अण्वस्त्रांपैकी 3750 अस्त्रांची सुरक्षा दलांनी तैनात केली आहे. त्यातील 2000 अस्त्रे अत्याधिक सतर्कता म्हणून संचालनाच्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत. अण्वस्त्रांच्या संख्येत कपात होण्याचे श्रेय अमेरिका आणि रशियाला देण्यात आले आहे. अर्थात, याच दोन देशांकडे जगातील एकूण अण्वस्त्रांच्या 90 टक्‍के अस्त्रे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असे असूनसुद्धा 2010 मध्ये अमेरिका आणि रशियादरम्यान झालेल्या स्टार्ट समझोत्यामुळे अण्वस्त्रांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. या कराराची मुदत 2021मध्ये संपणार आहे. अहवालानुसार, अमेरिकेजवळ 6185, रशियाकडे 6500, ब्रिटनकडे 200, फ्रान्सकडे 300, चीनकडे 290, पाकिस्तानकडे 150 ते 160, भारताकडे 130 ते 140 आणि इस्रायलकडे 80 ते 90 अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक शैनन काइल यांच्या म्हणण्यानुसार, जगातील देश अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवू इच्छितात; मात्र त्यांचे आधुनिकीकरण करून आकार लहान करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे.

अण्वस्त्रे ठेवणे सोपे व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. यातील काही बॉम्ब अत्यंत घातक असून, त्यात किरणोत्सार करणारे घटक अधिक प्रमाणात भरले आहेत. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या समूहाने 2018 मध्ये दिलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे सध्या 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्रे बनविण्याचा हाच वेग पाकिस्तानात कायम राहिला, तर 2025 पर्यंत पाकिस्तानकडे 220 ते 250 अण्वस्त्रे असतील. असे घडल्यास पाकिस्तानचा सर्वाधिक अण्वस्त्रसंपन्न देशांमध्ये पाचवा क्रमांक लागेल.

अहवालाचे प्रमुख लेखक एम. क्रिस्टेनसेन, ज्युलिया डायमंड आणि रॉबर्ट एस. नोरिस यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्वजण वॉशिंग्टन डीसी मधील “फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट’च्या आण्विक माहिती योजनेचे संचालक आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्याच लष्करी गुप्तचर संघटनेने 1991 मध्ये एक अंदाज बांधला होता. 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्रे असू शकतात असे या संघटनेने म्हटले होते. प्रत्यक्षात ती कितीतरी अधिक वेगाने वाढली आहेत. सीआयए या अमेरिकी गुप्तचर संघटनेचे वरिष्ठ अधिकारी केविन हलबर्ट यांच्या मते, पाकिस्तान हा सर्वांत धोकादायक देशांपैकी एक आहे. पाकिस्तानची अशी भीतीदायक प्रतिमा बनण्याचे कारण म्हणजे, तीन प्रकारची जोखीम त्या देशात खतरनाक पद्धतीने वाढत आहे. एक म्हणजे दहशतवाद, दुसरी म्हणजे रसातळाला चाललेली अर्थव्यवस्था तर तिसरी जोखीम अण्वस्त्रांचा बेसुमार साठा ही आहे.

आर्थिक संकटाची हीच अवस्था उत्तर कोरियातसुद्धा आहे. सूडभावना आणि ईर्ष्या हे व्यक्‍तीच्या स्वभावातील असे दोन दोष आहेत, ज्यामुळे विवेक आणि संयम माणसाला सोडून जातात. अशा स्वभावाची अत्यंत भेसूर परिणती अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या रूपाने आपण पाहिली आहे. अमेरिकेने या अणुहल्ल्याचे पाप अशा वेळी केले होते, जेव्हा जपानने जवळजवळ आपला पराभव मान्य केला होता. जगासाठी पाकिस्तान खतरनाक देश असो वा नसो, भारतासाठी मात्र तो खतरनाकच आहे, यात कोणालाही कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.

अनेक दशकांपासून पाकिस्तान भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवादाचे समर्थन करीत आला आहे. अर्थात, दहशतवाद्यांना आसरा देण्याचा मार्ग आता पाकिस्तानलाही डोईजड ठरू लागला आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांत दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी मोहिमा आखाव्या लागल्या आहेत. एवढे असूनसुद्धा पाकिस्तानातील मोठी लोकसंख्या, लष्कर आणि गुप्तचर संघटना तालिबान, अल्‌ कायदा, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहंमद अशा दहशतवादी गटांना खतरनाक मानत नाही. या दहशतवाद्यांना “धर्मासाठी कर्तव्याचे पालन करणारे उत्तम सैनिक’ मानण्याची मानसिकता तेथे आहे.

आजमितीस पाकिस्तानात काही दहशतवादी संघटना इतक्‍या शक्‍तिशाली बनल्या आहेत की, लष्कर-ए-झांगवी, पाकिस्तानी तालिबान, अफगाण तालिबान आणि अन्य काही दहशतवादी गट थेट लोकनियुक्‍त सरकारलाच आव्हान देत आहेत. लोकनियुक्‍त सरकार पाडून लष्करासोबत सत्ता हस्तगत करण्याचे या संघटनांचे मनसुबे आहेत. जर असे घडले आणि पाकिस्तानातील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडली, तर पाकिस्तान हा जगासाठी सर्वाधिक खतरनाक देश ठरण्यास वेळ लागणार नाही. अशा नाजूक स्थितीत सर्वाधिक धोका भारताला पत्करावा लागेल. कारण पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटनांचा भारत हा शत्रू क्रमांक एक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान सत्तेत आल्यावर ते दहशतवादाचा लगाम खेचतील, अशी अपेक्षा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते कठपुतळी पंतप्रधान आहेत, असेच दिसून येते.

या परिस्थितीमुळेच असे म्हटले जाते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्रयुद्ध सुरू झालेच, तर पहिल्याच क्षणापासून 12 कोटी लोक बाधित होऊ शकतात. अशा स्थितीत ज्या देशावर पहिला अणुबॉम्ब पडेल त्या देशातील दोन कोटी लोकांचा तत्काळ मृत्यू होईल. त्याचप्रमाणे किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेले कोट्यवधी लोक त्याचा प्रभाव 20 वर्षे भोगत राहतील. अशा प्रकारचे युद्ध सुरू झाले आणि अण्वस्त्रांचे हल्ले सुरू झाले, तर अण्वस्त्रांना हवेतच नष्ट करण्याचे तंत्र सध्या फारसे प्रभावी नाही. त्यामुळेच कदाचित इम्रान खान भारताबरोबर असलेले सर्व प्रश्‍न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा आग्रह करत असून, युद्धाचे चांगले परिणाम कधीच होत नाहीत, असे म्हणत आहेत.

पाकिस्तानकडे सध्या केवळ टेक्‍टिकल अण्वस्त्रे असून, त्यांची मारक क्षमता अपेक्षेपेक्षा कमी आहे. कदाचित म्हणूनसुद्धा इम्रान खान यांना असा पवित्रा घ्यावा लागत असेल. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे केवळ जमिनीवरूनच डागता येतात. ती डागण्यासाठी पाकिस्तानकडे “शाहीन’ हे क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता 1800 ते 1900 किलोमीटर आहे. याउलट भारताकडे “अग्नी’ सारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांची संपूर्ण मालिका उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे उपग्रहावरून टेहळणी करण्याचे तंत्रज्ञान भारताकडे आहे.

भारताची वचनबद्धता केवळ एवढीच आहे की, अण्वस्त्राचा वापर प्रथम करायचा नाही, हे भारताचे धोरण आहे. पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रांच्या स्पर्धेत सहभागी असणे भारतासाठी धोकादायक असून, जगातील इतर देशांनी अण्वस्त्रांचे सुरू केलेले आधुनिकीकरण हाही जगासाठी मोठा धोका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)