प्रेरणा : जात धर्माविना मिळविले प्रमाणपत्र

– दत्तात्रय आंबुलकर

“जात आणि धर्म नाही’ असे प्रमाणपत्र मोठ्या प्रयत्नपूर्वक मिळविणाऱ्या ऍड. स्नेहा यांनी जिद्दीने प्रयत्न करून शेवटी अशाही प्रकारचे प्रमाणपत्र मिळू शकते हे सिद्ध केले. यासाठी स्नेहा यांनी आपली बाजू मोठ्या खंबीरपणे मांडली. परिणामी जातीचे प्रमाणपत्र ही नित्याची व नेहमीचीच बाब भासत असली तरी जातीविना असणाऱ्या व्यक्‍तिगत प्रमाणपत्राची मात्र ही पहिलीच बाब ठरली.

आपल्याकडे कधीच जात नाही ती व्यक्‍तिगत बाब म्हणजेच माणसाची “जात’ होय, अशी सामाजिक धारणा आहे. प्रत्येकजण जन्माला येतो तोच मुळी त्याच्या जात आणि धर्म यांच्या ठप्प्यांसह व ही ओळख व्यक्‍तीची आयुष्यभर साथ करते. मात्र, या साऱ्या कुंपणांना छेद देत भारतातील कोण आहे ही जात आणि धर्माविना प्रमाणपत्र मिळविणारी महिला ते पाहू या…

वेल्लोर जवळील तिरुपत्तूर येथील या जिद्दी महिलेचे नाव म्हणजे ऍड. स्नेहा. त्यांनी देशातील जात व धर्म नसण्याच्या तपशिलासह आपले व्यक्तिगत प्रमाणपत्र मिळवून दाखविले. स्नेहाच्या बालपणापासून आई-वडिलांनी त्यांच्या जन्माचा दाखला असो किंवा शाळेतील नाव नोंदणीसारखे प्रमाणपत्र, स्नेहाच्या या साऱ्या कागदपत्रांत त्यांच्या आई-वडिलांनी धर्म आणि जात यांचा तपशील कधीच नोंदविला नाही. आपल्या या भूमिकेवर ते कायम राहिले.

आपल्या आईवडिलांची व्यक्‍तिगत प्रमाणपत्रात जात-धर्म न लिहिण्याची हीच भूमिका स्नेहा यांनी कायम राखली व आपल्या व्यक्तिगत प्रमाणपत्रात आपला धर्म आणि जात यांचा उल्लेख करण्यास स्पशेल नकार दिला. आपल्या याच भूमिकेला वैधानिक स्वरूप देण्यासाठी ऍड. स्नेहा यांनी न्यायालयात अर्ज करून आपली ओळख व ओळखीशी संबंधित प्रमाणपत्र केवळ भारतीय म्हणून असावी व त्याची रितसर व कायदेशीर नोंद आपल्या प्रमाणपत्रात व्हावी अशी न्यायालयीन याचिका दाखल केली.

सकृतदर्शनी साधा पण खऱ्या अर्थाने व वैधानिकच नव्हे तर सामाजिक संदर्भात क्रांतिकारी स्वरूपाच्या या याचिकेवर बराच खल झाला, साधक-बाधक चर्चा झाली. वकिलांनी न्यायालयीन चर्चेत विविध मुद्दे मांडले, युक्तिवाद केले. या साऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला सुमारे 8 वर्षे लागले व त्याचाच परिणाम म्हणून स्नेहाला केवळ “भारतीय’ या एकमेव ओळखीसह व धर्म आणि जातीच्या उल्लेखाविना असणारे ओळखपत्र-प्रमाणपत्र देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

अशा प्रकारे सुमारे 8 ते 10 वर्षांची सामाजिक व न्यायालयीन लढाई स्नेहाने स्वतःच्या जिद्दीवर यशस्वीपणे पूर्ण केली. यासाठी स्नेहाचे वकील असणे जसे कामाला आले त्याच्याच जोडीला त्यांची जिद्द व त्यांच्या आई-वडिलांची ठाम भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची व स्नेहासाठी प्रेरणादायी ठरते ती याचमुळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)