62 वर्षांपू्र्वी : हिंदी महासागरात जिवंत ज्वालामुखी

ता. 23, माहे जानेवारी, सन 1959

वादळी हवेत जहाजांचे नियंत्रण करणारे उपकरण 

मॉस्को, ता. 22 – वादळी हवेत जहाजांच्या इंजिनांची गती इष्ट त्या प्रमाणांवर नियंत्रित करणारे एक उपकरण रीगा येथील यंत्ररचनाकारांनी बनविले आहे. जेव्हा वादळाने हेलकावे खाऊन जहाजाचे सुकाणू पाण्याच्या बाहेर येते तेव्हा ते उगाच फिरत राहून त्याची फुकट झीज व खराबी होऊ नये यास्तव असे सुकाणू पाण्याबाहेर उघडे पडताच इंजिनांची गती हे उपकरण आपोआप कमी करते आणि यामुळे वेग कमी न होता सुकाणू सुरक्षित राहते. महासागरात जाणाऱ्या आगबोटीवर या उपकरणाची चाचणी घेण्यात आलेली आहे.

नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष पदावर देशमुखांची नेमणूक? 

नवी दिल्ली – नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद चिंतामण देशमुख यांनी स्वीकारावे असा त्यांना आग्रह करण्यात येत आहे, असे माहीतगार गोटातील वृत्त आहे. सध्याचे उपाध्यक्ष व्ही. टी. कृष्णाम्माचार्य येत्या मार्च महिन्यात ह्या जबाबदारीतून मुक्‍त होणार आहे. योजनेमध्ये अग्रहक्‍क कोणत्या योजनांना द्यावे हे ठरविण्याची जबाबदारी उपाध्यक्षांची असते.

शेतमजुरांची किमान मजुरी प. बंगाल सरकार ठरविणार 

नवी दिल्ली – शक्‍य तितक्‍या लवकर आणि काही झाले तरी हे वर्ष संपण्यापूर्वी शेतमजुरांचे किमान मजुरीचे दर ठरवून द्यावयाचे असे प. बंगाल सरकारने ठरविल्याचे त्या राज्याचे कामगारमंत्री सत्तार यांनी सांगितले. त्यांनी आणखी असे सांगितले की, शेत मजुरांचे किमान वेतन ठरविणारे प. बंगाल हे देशातील पहिलेच सरकार आहे. सर्व राज्यांत असा प्रयत्न प्रथम बंगालमध्येच होत आहे.

हिंदी महासागरात जिवंत ज्वालामुखी 

मॉस्को – हिंदी व पॅसिफिक महासागरांचा अभ्यास करणाऱ्या सोव्हियत शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, या महासागराचा पाऊण हिस्सा तळ हा पर्वतमय असून त्यात जिवंत ज्वालामुखीही आहेत. आजवर असा समज होता की, सागरतळ हा बहुतांशी सपाट असावा. हे जलांतर्गत ज्वालामुखी 3000 मीटर (जवळ जवळ दहा हजार फूट) उंचीचे आहेत. ते हिंदी महासागराच्या दक्षिण विभागात व पॅसिफिक महासागराच्या न्यूझीलंडच्या पूर्वभागात आहेत. सोव्हियत शास्त्रज्ञांना सागर तळाशी ज्वालामुखीची राख विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेली आढळली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.