विविधा : छत्रपती शहाजीराजे भोसले

-माधव विद्वांस

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन. (निधन 23 जानेवारी 1664) ते अत्यंत बुद्धिमान, युद्धप्रसंगातील डावपेच आखणारे, तसेच कुशल प्रशासक होते. आपल्या पराक्रमाचे व हुशारीच्या जोरावर त्यांनी निजाम तसेच विजापूर दरबारी आपले वजन प्रस्थापित केले होते. मालोजीराजे भोसले व दीपाबाई (उमाबाई) या दांपत्याचे पोटी त्यांचा जन्म वेरूळ येथे झाला. 

त्यांचा जन्म 15 किंवा 18 मार्च 1594 रोजी झाला. (त्यांच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) मालोजीराजे यांना शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र होते. फलटणच्या वणगोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या दीपाबाई (उमाबाई) ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत. मालोजीराजे मलिकअंबरचे सरदार म्हणून नियुक्‍त झाल्यावर ते अहमदनगर येथे आले.

मालोजीराजे 1610-11 दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत धारातीर्थी पडल्यावर निजामाने मालोजींचा वारसा त्यांच्या मुलांना दिला. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांचेशी झाला.
वर्ष 1624 मध्ये शहाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला मदत करून आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला मात्र त्यावेळी त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले. परंतु 1627 मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले.

सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर निजामशाहीत शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत आले. कालांतराने मोगलांकडे गेले. मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले होते. पण निजामशाही बुडविण्याचा शाहजहान बादशाहाचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांची साथ सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसवून पेमगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला. शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतचा प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्‍चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. यावेळी पेमगिरी हे सत्तास्थान झाले होते व निजामाचे नावाने शहाजीराजेच कारभार करत होते. 

निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले मात्र वर्ष 1636 मध्ये शाहजहानने अखेर निजामशाही खालसा केली. त्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीत आले. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा नाराज होता. त्यांना 26 जुलै 1648 रोजी अचानक कैद करण्यात आले. मात्र शिवाजी महाराजांनी चातुर्याने शाहजहानचा मुलगा मुराद याच्यामार्फत आदिलशहावर दबाव आणून शहाजींची सुटका केली. शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे येथे शिकारीस गेले असता घोड्यावरून पडून ते मरण पावले. अभिवादन. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.