कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला प्रदूषणाचे ग्रहण

– विशाल धुमाळ

दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला प्रदूषणाचे लागलेले ग्रहण सुटणार तरी कधी, असा प्रश्‍न सध्या नागजरिक विचारत आहेत. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील वाढते प्रदूषण ही या भागात गंभीर समस्या बनली आहे. या औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, तसेच रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अतिघातक गॅस हवेत सोडले जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही कंपन्या या विविध प्रकारचे खराब मिश्रण त्यांच्या केमिकल बॉयलरच्या माध्यमातून जाळत असतात, त्यामुळे त्या कंपन्यांच्या बॉयलर मधून वेगळ्याच प्रकारचा धूर बाहेर निघत असल्याचेही परिसरात बोलले जात आहे. सध्या कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.

ज्या दिवशी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आणि औद्योगिक वसाहतीतून पाणी वाहू लागते त्यावेळी कंपन्या याचा फायदा उचलून दूषित पाणी प्रक्रिया न करताच या पावसाच्या पाण्यात सोडत आहेत. ते पाणी पुढे जाऊन ओढ्या-नाल्याला मिळते, तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील हे पाणी येते, याचा परिणाम हा त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यांना श्‍वसनाचा त्रास होत आहे, याचबरोबर आताडीवर सूज येणे, पांढऱ्या- तांबड्या पेशी कमी-जास्त होणे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे.

या परिसरातील काही कंपन्या कामगारांना सुरक्षा यंत्रणा देखील देत नसल्याने कामगारांना विविध घटनांशी, समस्यांशी सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांमध्ये कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत, आगी लागल्या आहेत आणि त्यात काही जण दगावले आहेत, तर काहींना अपंगत्व आले आहे.

एकूणच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाने सर्वसामान्यांना त्रास होत आहे तर येथील कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याने कामगारांच्या जीवितास धोका आहे, अशा दुहेरी कात्रीत येथील कामगार वर्ग आणि नागरिक अडकले आहेत. याबाबत परिसरातील कंपन्यांच्या वरिष्ठ विभागाने आणि प्रशासनाने दखल घेऊन पाहणी करून वस्तुस्थिती तपासून योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)